Nagpur News : तुम्ही डेटिंग अॅपचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. नागपुरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना विशिष्ट बारमध्ये बोलावून हजारो रुपयांना लुटणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. पुण्यातील एका नामांकित बारमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी बार मालकासह टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.
'हॅपन' ॲपवर मैत्री आणि ३४ हजारांचा गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय तक्रारदार हर्षद याने दोन-तीन महिन्यांपूर्वी नवीन मित्र जोडण्यासाठी ‘हॅपन' नावाचं डेटिंग ॲप डाऊनलोड केलं होतं. ११ एप्रिल रोजी त्याची तनू नावाच्या मुलीशी ओळख झाली. चॅटिंगनंतर तिने हर्षदला एलआयसी बिल्डिंगजवळ भेटायला बोलावलं. मात्र, जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा ती तरुणी ॲपवरील फोटोपेक्षा वेगळी होती. तो फोटो माझ्या बहिणीचा आहे, असं सांगून तिने त्याला बोलण्यात गुंतवलं आणि जवळच असलेल्या 'सुआ बार'मध्ये घेऊन गेली. बारमध्ये गेल्यावर तरुणीने घाईघाईत महागड्या दारुच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. हर्षदला संशय आल्याने त्याने बिल मागितले असता, वेटरने चक्क ३४,२१३ रुपयांचे बिल त्याच्या हातात टेकवले. आश्चर्याची बाब म्हणजे सामान्य हॉटेलमध्ये काही हजारांत होणाऱ्या पदार्थांचे बिल पाचपट लावण्यात आले होते. जेव्हा हर्षदने बिलावर आक्षेप घेतला, तेव्हा वेटरने दुसरे स्पेशल मेन्यू कार्ड दाखवले, ज्यामध्ये दर प्रचंड जास्त होते. हा सर्व प्रकार बार मालकाच्या संगनमताने सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.
तनू नावाची तरुणी गायब...
बारचा मालक म्हणून आलेल्या आकाश गजभिये नावाच्या व्यक्तीने हर्षद याला धमकावण्यास सुरुवात केली. तुझ्याबद्दल आम्हाला सर्व माहिती आहे, बिल भरले नाही तर डेटिंग अॅपचा वापर केल्याबद्दल तुझी बदनामी करू अशी धमकी देण्यात आली आहे. शिवाय तुझे कपडे काढून बारच्या बाहेर तशाच स्थितीत पाठवू, जास्त गडबड केल्यास तुला जीवे मारू अशी धमकी देऊन त्याला जबरदस्तीने बिल भरण्यास भाग पाडले. भीतीपोटी हर्षदने सायंकाळी क्यूआर कोडवरून ऑनलाइन 34 हजार 213 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्याच्या सोबत आलेली तनू नावाची तरुणी तिथून गायब झाली होती. घटनेनंतर हर्षदने पैसे परत मागितले असता बार व्यवस्थापक सुप्रिया गजभिये हिने पैसे परत देण्यास नकार देत त्याला धमकी दिली. त्याचवेळी तेथे आलेल्या उज्ज्वलकुमार नामक बाउन्सरने त्याला शिवीगाळ करत तू मला उद्या भेट, तुला दाखवतो, अशी धमकी दिली.
बारमधून बाहेर पडल्यावर हर्षदला जवळील पानटपरी चालकाने हा गोरखधंदा असल्याची माहिती दिली. डेटिंग ॲपवरून येणाऱ्या तरुणींना वापरून ग्राहकांना या बारमध्ये आणले जाते आणि त्यानंतर अवाजवी बिल आकारून धमकावून पैसे उकळले जातात, असे त्याने सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर हर्षदने सदर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून बारमधील सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार आणि या टोळीने इतर कुणाला अशाच पद्धतीने गंडवले आहे का, याचा तपास सुरू आहे.