जाहिरात

'दारुड्याला घरी कशाला आणलं?'; पत्नीच्या वाक्याने चक्र फिरलं; मदतीला आलेले 3 विद्यार्थी बनले 'क्रूरकर्मा'

एका क्षुल्लक मोहाच्या क्षणाला बळी पडल्याने तिघांनी एक जीव घेतला आणि आता तिघांचे करियर भलत्याच वळणावर गेले आहे. 

'दारुड्याला घरी कशाला आणलं?'; पत्नीच्या वाक्याने चक्र फिरलं; मदतीला आलेले 3 विद्यार्थी बनले 'क्रूरकर्मा'
AI Image

Nagpur News : नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मद्यधुंद ड्रायव्हरला मदत करण्याच्या बहाण्याने तीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी त्याची हत्या केली आणि त्याची कार तसेच मोबाइल फोनची चोरी केली. 

नेमकं काय घडलं? 

या घटनेची सुरुवात 2 एप्रिल रोजी गुरुवारी रात्री झाली. नागपूरच्या वर्धमान नगर उड्डाणपुलावर एक लाल रंगाची अल्टो कार उभी होती. त्या कारचा ड्रायव्हर, 44 वर्षीय सुचित भोजपुरे, मद्यधुंद अवस्थेत स्टिअरिंगवर झुकलेला होता. तिथून जाणाऱ्या तीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी त्याला पाहिलं आणि मदतीसाठी विचारपूस केली.

सुचित भोजपुरे हा स्वतः स्पेअर पार्ट व्यवसाय करणारा व्यावसायिक असला तरी मद्यधुंद अवस्थेत असल्याने सुचितला गाडी चालवता येत नव्हती. त्याने या विद्यार्थ्यांना विनंती केली की, त्याला नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील भिवापूर येथे एका सामानाची डिलिव्हरी द्यायची आहे. ती देण्यात त्याला मदत करावी आणि नंतर त्याला त्याच्या घरी वाडी येथील बाबा त्रिमूर्ती नगर येथे सोडावे. या विद्यार्थ्यांनी त्याला भिवापूर येथे नेऊन ती सामानाची डिलिव्हरी देण्यात मदत केली. त्यानंतर त्याच्या कडून त्याच्या पत्नीचा नंबर घेऊन तिच्याशी बोलले. तिने आधी त्याला घरी सोडण्याविषयी त्यांना सांगितले. मात्र, त्याच्या घरी पोहोचले तेव्हा घर बंद होते. आरोपींनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी पुन्हा त्याच्या पत्नीला फोन केला तेव्हा ती उलट त्या दारुड्याला घरी कशाला आणलं असं म्हणून त्यांच्यावर ओरडली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात वाईट विचार फिरू लागले. हा माणूस कुणालाच नको आहे तेव्हा कदाचित त्याची अनुपस्थिती कुणालाच जाणवणार नाही. दरम्यान त्यांना त्याच्या लाल अल्टो कार आणि महागड्या मोबाइल फोनची भुरळ पडली होती. त्यांनी त्याला खडगाव परिसरात एका निर्जन ठिकाणी नेलं आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना सुचितची लाल रंगाची अल्टो कार आणि त्याचे दोन महागडे मोबाइल फोन आवडले होते. या वस्तू चोरण्याच्या लोभापायी त्यांनी हा खून केला. विशेष म्हणजे, हे तिन्ही विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या संपन्न घरातील आहेत. तरीही केवळ लालसेपोटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती आहे. 

नक्की वाचा - Nagpur News : आधी काळी जादू मग लग्नासाठी ब्लॅकमेलिंग; नागपुरात मुस्ताक शेखच्या कृत्याने संताप

पोलिसांनी १२ तासात लावला छडा...


शुक्रवारी खडकगाव रोडवरील स्मशानभूमीजवळ सुचितचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. तेव्हा पोलिसांची चक्रे फिरू लागली. त्याची ओळख पटू नये या हेतूने विद्यार्थ्यांनी सूचितचे कपडे काढले होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले. आरोपींपैकी एकाने सुचितच्या पत्नीला फोन केला होता, त्यावरून पोलिसांना संशय आला.

तिन्ही आरोपी हे बी.टेक अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत:
१. आर्यन शेंडे (२२ वर्षे): कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी.
२. ऋषभ कांबळे (२० वर्षे): मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी.
३. अनुज रमेश (१९ वर्षे ): मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी.

पोलिसांनी जेव्हा या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, तेव्हा त्यांनी सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका आरोपीच्या बुटावर रक्ताचे डाग आढळले आणि त्यांची सत्यस्थिती समोर आली. वाडी पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून कार आणि मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी गुन्हा कबुल केला असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी सांगितले. एका क्षुल्लक मोहाच्या क्षणाला बळी पडल्याने तिघांनी एक जीव घेतला आणि आता तिघांचे करियर भलत्याच वळणावर गेले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com