Nagpur News : 'पेपर लिक करणाऱ्यांना फाशी द्या', आकांक्षाचं कुटुंब अजूनही धक्क्यात; सरकारकडे केली मागणी

नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या आकांक्षाची आई नीलम चतुर्वेदी हुंदके देऊन रडत होत्या. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News : पेपर लिक करणारे हे सर्वात मोठे गुन्हेगार असतात, कारण ते केवळ तरुण विद्यार्थ्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त करत नाहीत, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही पूर्णपणे देशोधडीला लावतात. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, त्याशिवाय इतर काहीही मान्य नाही. नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या आकांक्षाची आई नीलम चतुर्वेदी हुंदके देऊन रडत होत्या.  त्यांची लेक आकांक्षाने या वर्षी 'नीट' (NEET) पेपर लिक झाल्यानंतर स्वत:ला संपवलं होतं. आकांक्षाने सुसाइड नोटमध्ये पुन्हा नीटची परीक्षा देण्याची हिम्मत नसल्याचं म्हटलं होतं. आकांक्षाचा मृत्यू कुटुंबावर मोठा आघात आहे.

कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, कुटुंब त्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाही. आकांक्षासोबत त्यांचं सर्वस्व संपलं आहे. त्यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी नीटची तयारी करत होती आणि तिच्या अभ्यासासाठी कुटुंबाने शेत व दागिने विकले होते. आता ना आकांक्षा आहे, ना काही उरलंय. कुटुंब जणू उद्ध्वस्त झालं आहे. आम्हाला ही शिक्षा का दिली गेली, असा सवालही त्यांनी केला आहे. असं लाखो कुटुंबांसोबत घडलं असेल, याला कुठे तरी थांबवलं पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

Advertisement

पेपर लिकच्या दोषींना फाशीची शिक्षा द्या...

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर त्या म्हणाल्या की, हे पहिले पाऊल आहे. परंतु यामुळे आकांक्षा परत येणार नाही. जे पेपर लिकचे दोषी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्याहून कमी काहीही होता कामा नये. NDTV मराठीने त्यांना विचारलं की, पेपर लिकच्या घटना अनेकदा आणि अनेक राज्यांमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये पुन्हा कधीही पेपर लीक होऊ नये यासाठी मजबूत यंत्रणा तयार करणे देखील आवश्यक नाही का? यावर सहमती दर्शवत त्या म्हणाल्या की, होय हे सर्वात महत्त्वाचे आहे. हेच झाले पाहिजे.

नक्की वाचा - धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर, आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे?

पेपर लिक झाल्यानंतर आकांक्षा चतुर्वेदी हिने नागपूरमध्ये आत्महत्या केली होती. नंतर तिची सुसाइड नोट देखील सापडली होती, ज्यामध्ये तिने आता आणखी परीक्षांची तयारी करण्यास असमर्थ असल्याचे सांगत आई-वडिलांची माफी मागितली होती. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलकांमध्ये नीलम चतुर्वेदी जेव्हा मुलगी आकांक्षाचा फोटो हातात घेऊन पोहोचल्या, तेव्हा तेथील वातावरण खूप गंभीर झाले होते. आपल्या मागणीसाठी रविवार, २६ जुलै रोजी संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत नागपूरच्या संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यासाठी त्यांनी नागपूर पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.


Topics mentioned in this article