- प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे घडलेली घटना अत्यंत सुन्न करणारी आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार केवळ एका हत्येपुरता मर्यादित नसून समाजाच्या बदलत्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांतून एका तरुणाची पती-पत्नीने मिळून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे ही घटना भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी घडत असताना उपस्थित नागरिक मदतीसाठी पुढे येण्याऐवजी या घटनेचा व्हिडिओ काढण्यात मग्न होते.
भरदिवसा भरचौकात निर्घृण हत्या | Nagpur Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण सागर वानखेडे याचे आरोपी महिला सोनाली गजभिये हिच्याशी लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्याशी झाल्यानंतरही सागर तिला वारंवार त्रास देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून गजभिये दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. गुरुवारी (5 मार्च) खापरखेडा शिवारात राजू आणि सोनालीने सागरला गाठून त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा: Nagpur News: रंगाचा थेंब पडला अन् आजीने 4 वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी ओतलं, CCTV पाहून होईल संताप; पाहा VIDEO)
लोकांसमोरच रक्तरंजित खेळ
राजू आणि सोनाली या दोघांनीही रागाच्या भरात सागरवर हल्ला चढवला. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडून मदतीसाठी याचना करत होता, पण आरोपींचे हात थांबले नाहीत. या घटनेतील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेले लोक. समोर एका तरुणाचा जीव जात असताना लोक केवळ प्रेक्षक बनून उभे होते. अनेकजण आपल्या मोबाइलमध्ये हत्येचा घटना शूट करत होते, पण एकानेही पुढे होऊन आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
(नक्की वाचा: Nandurbar News: नंदुरबार हादरले! ती अचानक झाली गायब, 21 दिवसांनंतर शेताच्या बांधावर सापडला मृतदेह)
पोलिसांची कारवाईघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आलाय. आरोपी पती-पत्नीला (राजू आणि सोनाली गजभिये) पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वाढत्या गुन्हेगारीसोबतच लोकांच्या संवेदनशून्यतेवरही सर्वत्र टीका होत आहे.