Nagpur News : शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची मोठी कारवाई, आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

एसआयटीमार्फत करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही या घोटाळ्याचे मुख्य आरोपी असून तिसरा मुख्य आरोपी निलेश वाघमारे गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे. तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

एसआयटीमार्फत करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अटक केलेले हे दोन्ही आरोपीही यापूर्वी फरार होते. मात्र, रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी न देता थेट न्यायालयीन कोठडीत पाठवले.

नक्की वाचा - Gadchiroli News : स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर नक्षलवादी नियंत्रित गावात पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांमध्ये उत्साह

या प्रकरणी NDTV ने चौकशी समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता पोलीस अधिकारी उच्च न्यायालयात पोलीस कोठडीसाठी पुन्हा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली. प्राथमिक अहवालानुसार, रोहिणी कुंभार आणि सिद्धेश्वर काळुसे यांनी शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांच्या कार्यालयाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाले नसतानाही ऑनलाईन शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट शालार्थ आयडी तयार केले.

Advertisement

या बनावट आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून शासनाची 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, रोहिणी कुंभार यांनी 244 बोगस शालार्थ आयडी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तयार करून संबंधितांचे वेतन मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया राबवली, तर सिद्धेश्वर काळुसे याने 154 बोगस आयडी तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Topics mentioned in this article