
संजय तिवारी, प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांच्या बॉर्डरवर सुरक्षा दलाचा कडक बंदोबस्त आहे. या सर्व तणावामध्ये नागपूरमधील एका महिलेनं अवैधरित्या लाईन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
सुनीता असं या 43 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. त्या बुधवारी (14 मे) रोजी लडाख भागातील कारगिल परिसरातील शेवटच्या गावातून सीमा सुरक्षा दलाची नजर चुकवून पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती आहे.
सुनीता यांनी LOC पार करण्यापूर्वी त्यांच्या 15 वर्षांच्या मुलाला गावाजवळ थांब आणि मी परत येईपर्यंत वाट पाहा, अशे सांगितले होते. गावकऱ्यांना तो मुलगा एकटा असल्याचे दिसताच त्यांनी विचारपूस केली तेव्हा प्रकार उघडकीस आला. त्या सध्या पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात आहेत.
( नक्की वाचा : Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )
यापूर्वीही केला होता प्रयत्न
सुनीता या उत्तर नागपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत. सुनीता गेल्या दहा वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत आहेत. त्या मुलासोबत आईच्या घरी राहतात. त्यांच्यावर नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती तिच्या भावाने दिली असल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली. त्यांनी यापूर्वीही अट्टारी सीमेवरून पाकिस्तानात अवैधरित्या प्रवेश करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला होता मात्र तो जाणून पाडण्यात आला होता. पाकिस्तानातील एका पास्टरला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात जाण्याचा सतत प्रयत्न करत असल्याची माहिती आता समोर आली आहे.
नागपूर पोलिसांनी कारगिल पोलिसांशी संपर्क साधला असून त्या पाकिस्तानात नक्की कशा गेल्या याबाबत माहिती गोळा केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world