ओलामधून पत्नीचा मृतदेह आणला अन् मोठ्या फ्रीजमध्ये ठेवला; मृत्यू प्रमाणपत्रावरुन पतीचं बिंग फुटलं!

मृत्यू प्रमाणपत्रावरुन या नराधमाचं बिंग फुटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी 

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या करणाऱ्या निर्दयी पतीला पेल्हार पोलिसांनी अटक करून नायगांव पोलिसांच्या हवाली केलं आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह 12 तासांपेक्षा जास्त (Crime News) काळ एका मोठ्या फ्रीजमध्ये ठेवला होता. इस्माईल अब्दुल कयूम चौधरी (वय 24) असं आरोपीचं नाव आहे. तर 24 वर्षीय खुर्शिदा खातून इस्माईल चौधरी असं दुर्दैवी मृत पत्नीचं नाव आहे.

खुर्शिदा आणि इस्माईल वसई पूर्वेच्या कमान परिसरात राहत होते. या दोघांनी जून महिन्यात लग्न केलं होतं. आरोपी जवळच्याच एका कंपनीत काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल बुधवारी दुपारी 2 वाजता अचानक जेवायला घरी आला. त्यावेळी त्याने बराच वेळ घराची कडी वाजवली होती, मात्र खुर्शिदा दार उघडत नव्हती. काही वेळानंतर, त्याच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि त्याचवेळी एक माणूस घरातून बाहेर पळाला. इस्माईलने या व्यक्तीबद्दल विचारले. पण त्याची पत्नी त्याची दिशाभूल करत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.

नक्की वाचा - Ghatkopar hoarding case : 17 जणांचा जीव घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपीला जामीन 

डॉक्टरांकडून बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुर्शिदाची हत्या केल्यानंतर आरोपीला तिचा मृतदेह दफन करायचा होता. पण त्यासाठी त्याला मृत्यू दाखल्याची गरज होती. त्यांनी काही डॉक्टरांना बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी सांगितले. पण या सर्वांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यानंतर तो ओला कारमध्ये पत्नीचा मृतदेह घेऊन वसई पूर्व नवजीवन परिसरात राहणाऱ्या त्याच्या भावाकडे गेला. त्या दोघांनी मिळून तिचा मृतदेह खराब होऊ नये म्हणून एका मोठ्या फ्रीजमध्ये ठेवला आणि बनावट मृत्यू प्रमाणपत्रे बनवणाऱ्या डॉक्टरांचा शोध सुरू केला. मात्र, या काळात, पेल्हार पोलिसांना खबऱ्यांकडून बनावट मृत्यू प्रमाणपत्रांची मागणी करणाऱ्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

खोटी माहिती देऊन दिशाभूल
आरोपींची चौकशी केल्यावर पोलिसांना आढळले की, खुर्शिदाचा भाऊ पुण्यात राहतो. आरोपी इस्माईलने त्याच्या पत्नीच्या भावाला खुर्शीदाच्या पोटात खूप दुखत असल्यामुळे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. अशी खोटी माहिती देत त्याची दिशाभूल केली. त्यावेळी तिच्या भावाने सांगितले की तो पुण्याहून निघणार असून सकाळी वसईला पोहोचेल. मात्र त्या अगोदर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, ही घटना नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आम्ही आरोपीला अटक केली आणि त्यांना नायगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या नायगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.