नांदेड: नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची पित्याने हत्या केल्याची भयंकर घटना नांदेडच्या उमरी तालुक्यात घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हादरवुन टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी संजीवनी सुरने ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथे राहणारी होती. एक वर्षापूर्वी तिचा विवाह गोळेगाव येथील सुधाकर कमळे याच्यासोबत झाला होता. तिच्या वडिलांनी मोठ्या धुमधडाक्यात तिचे लग्न लावून दिले होते. मात्र संजीवनीचे विवाहापूर्वी गावातीलच एका तरुणासोबत संबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यामध्ये फोनवरुन बोलणे, भेटणे सुरु होते.
घटनेच्या दिवशी सासरची मंडळी बाहेर गेल्यानंतर संजीवनीने आपल्या प्रियकराला बोलावून घेतले. मात्र अचानक तिच्या सासरची मंडळी घरी आल्याने दोघेही रंगेहात सापडले. मुलगी तिचा सासरी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली तेव्हा सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडीलांना बोलावून घेतले. अवैध संबंधामुळे आपल्या मुलीचा संसार मोडतोय हे पित्याच्या लक्षात आले.
मुलगी आणि प्रियकर दोघांना घेऊन वडील गावाकडे निघाले. रस्त्यात त्यांनी दोघांचे हात बांधले अन् थेट त्यांना विहिरीत फेकून दिले. यात संजीवनी सुरणे आणि लखन भंडारे या दोघांचाही मृत्यू झाला आहे. यानंतर मुलीचे वडील स्वतः पोलिसानं शरण येऊन घटनेची माहिती दिली. या प्रकरणी उमरी पोलिस अधिक तपास करत आहेत. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.
( नक्की वाचा : Love Story : '15 दिवस नवऱ्यासोबत, 15 दिवस प्रियकरासोबत...' 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब मागणी )