सरकारी नोकरी, महिन्याला लाखभर पगार; 500 रुपयांसाठी अधिकाऱ्याने केली आयुष्याची माती 

वर्ग दोन या पदाचा अधिकारी असलेला अमोल खैरनार याला शासनाकडून महिन्याकाठी लाखभर रुपये पगार मिळत होता.

Advertisement
Read Time: 2 mins
नांदेड:

योगेश लाठकर, प्रतिनिधी

शासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना अतिरिक्त पैशांचा मोह सुटता सुटत नाही, अशी परिस्थिती आहे.  महिन्याला लाखभर रुपयांचा पगार शासनाकडून मिळत असतानाही एक मोटार वाहन निरीक्षक केवळ 500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. 

राज्यातील अनेक शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचा भस्नारोग झाला आहे की, काय अशी शंका उपस्थित होत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात सीमावर्ती तपासणी नाक्यावर अमोल खैरनार हा 42 वर्ष वय असलेला मोटर वाहन निरीक्षक कार्यरत होता. तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची तपासणी करणे हे त्याचं काम होतं. वर्ग दोन या पदाचा अधिकारी असलेला अमोल खैरनार याला शासनाकडून महिन्याकाठी लाखभर रुपये पगार मिळत होता.

नक्की वाचा - अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव

पण अतिरिक्त पैशांचा मोह अमोल खैरनार यांना सुटता सुटेना आणि त्यातून त्यांनी या सीमावर्ती तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करताना स्वतःसाठी प्रति ट्रक पाचशे रुपयांची मागणी केली. या सततच्या मागणीला वैतागलेल्या एका तक्रारदाराने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर अमरावती लाचलुचपत विभागाने अमोल खैरनार यांच्या विरोधात सापळा रचला. या तपासणीत अमोल खैरनार हा एका खाजगी इसमाच्या मदतीने पाचशे रुपयांची लाच घेत असल्याचे सिद्ध झाले.

नक्की वाचा - Pune : इस्त्री करताना वीज गेली, मुलाला शाळेत सोडायची घाई; घरी परतली अन् महिलेच्या संसाराची 'राखरांगोळी' 

तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोटर वाहन निरीक्षक अमोल खैरनार यांना पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. आता या प्रकरणी आरोपी विरुद्ध नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरनार यांच्यासह त्यांचा खाजगी एजंट देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. सीमावर्ती तपासणी नाक्याची एसीबीने तपासणी केल्यावर त्या कार्यालयात 63 हजार 820 रुपये बेनामी आढळून आले. खैरनार याच्याकडे या रकमेबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ही रक्कम देखील लाचलुचपत विभागाने जप्त केली आहे. खरंतर खैरनार यांचे वय केवळ 42 वर्षे आहे. पुढील अनेक वर्ष त्यांची शासकीय सेवा असणार आहे. परंतु अतिरिक्त कमाईची चटक लागलेल्या खैरनार यांनी केवळ पाचशे रुपयांसाठी स्वतःचे नाव लाचलुचपत विभागात नोंदवून घेतले आहे. आता त्याला जेलवारीही करावी लागणार आहे.