प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: राज्यात महिला अत्याचारांचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसत आहे. नंदुरबारमध्ये एका ट्रॅक्टर शोरुममध्ये काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुझा पगार वाढवतो असं म्हणत या कर्मचारी महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर शोरुममध्ये काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना नंदुरबार येथे घडली आहे. याप्रकरणी एकाविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील श्रीनाथ इंडस्ट्रीज या ट्रॅक्टर शोरुम व लाईट हॉउसमध्ये महिला काम करीत होती. या शोरुममध्ये विजय होळकर याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.
विजय होळकर याने पिडीत महिलेला कार्यालयातील लाईट बंद करण्यास सांगितले. त्यानंतर सदर महिलेशी अतिप्रसंगी करण्याच्या उद्देशाने हात पकडून लज्जा वाटेल असे कृत्य करीत विनयभंग केला. तसेच गुन्हा दाखल करु नये यासाठी महिलेला तुझा पगार वाढवून देतो, असे संशयीताने आमिष दाखविले. त्यानंतर पुन्हा महिलेशी लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग केला.
दरम्यान, याबाबत पिडीत महिलेने नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार श्रीनाथ इंडस्ट्रीजच्या ट्रॅक्टर शोरुम व लाईट हाऊसमधील विजय होळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकचा तपास करत आहेत.