नंदूरबारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहादा येथे राहत असलेले राजेंद्र मराठे यांच्या हत्येसाठी त्यांच्याच जावयाने हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर प्रकार घडला. सासऱ्याची हत्या घडवून आणण्यासाठी जावई गोविंद सोनार याने काही जणांना तीन लाखांची सुपारी दिली होती. कौटुंबिक वादातून जावयाने 3 लाखांची सुपारी देत सासऱ्याची हत्या घडवून आणली. राजेंद्र मराठे यांच्या हत्येप्रकरणी निलेश पाटील, लकी बिरारे याला मुंबईच्या क्राईम ब्रँच युनिट-11 ने अटक केली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र मराठे यांचा जावई गोविंद सोनार यांच्यासोबत नेहमी वाद होत असायचा. या वादातून गोविंदने राजेंद्रच्या हत्येचा प्लान आखला. यासाठी जावयाने सासऱ्याच्या हत्येचा डाव आखला आणि तीन लाखांची सुपारी दिली. हत्या केल्यानंतर सासऱ्याचा मृतदेह जाळून टाकावा असं सुपारी दिलेल्या चौघांना सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, राजेंद्र साहित्य आणण्यासाठी मोटारसायकलने गेले होते. तेव्हा या चौघांनी राजेंद्रला मारहाण करून त्यांची हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट व्हावा यासाठी राजेंद्रचा मृतदेह नांदर्डे ते तळोदा रोडवर फरशी पुलाच्या खाली टाकून जाळण्यात आला.
राजेंद्र घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचवेळी फरशी पुलाजवळ एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी राजेंद्रची ओळख पटवली. शहादा येथे हत्या करून चौघेजणं बोरिवली येथे आल्याची माहिती क्राईम ब्रँच युनिट 11 ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी गोराईच्या पेप्सी ग्राऊंडजवळ सापळा रचला आणि चौघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे मोबाइल 45 हजार रुपये सापडले. चौंघानी राजेंद्र यांच्या हत्येची कबुली दिली. सुपारीच्या पैशातून ते मजामस्ती करणार होते. राजेंद्रची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह अर्धवट जळाल्याने हत्येचा प्रकार समोर आला. अखेर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.