Nashik 400 Crore Loot Case Update: नाशिकमधील 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लूट आणि अपहरण प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. ज्या तक्रारदाराने या मोठ्या लुटीचा दावा केला होता, त्यानेच आता पोलिसांवर गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुखांनी आपल्याला मारहाण केल्याचा खळबळजनक दावा तक्रारदार संदीप पाटील यांनी केला असून, याविरोधात त्यांनी आता थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
तक्रारदाराचे पोलिसांवर गंभीर आरोप
या प्रकरणातील फिर्यादी संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या SIT चे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी मुख्य आरोपींच्या समोरच त्यांना मारहाण केली.
आपण स्वतः फिर्यादी असूनही आपल्यालाच गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी आणि आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Beed News: बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय? )
न्यायालयीन लढाई आणि तक्रार
संदीप पाटील यांनी केवळ आरोप करून न थांबता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासोबतच त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडेही या मारहाणीबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. गृहविभागाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणात अटकेत असलेले ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक किशोर सावला यांच्यासह 7 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे, ज्यामुळे पोलिसांच्या तपासातील विश्वासार्हतेवर चर्चा सुरू झाली आहे.
काय होते प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील चोरला घाट परिसरात घडलेल्या एका कथित घटनेशी संबंधित आहे. संदीप पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली होती की, 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला एक कंटेनर लुटण्यात आला आहे.
तसेच काही अज्ञात व्यक्तींनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला होता. इतक्या मोठ्या रकमेचा आणि आंतरराज्य टोळीचा संबंध असल्याने या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती.
( नक्की वाचा : Satara News: साताऱ्यातील शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाखांचा गंडा,मुंबईच्या नगरसेविकेसह मंत्रालयातील 'बाबू' रडारवर! )
SIT चा तपास आणि कोर्टाचा निकाल
घटनेचे गांभीर्य ओळखून आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक बाबी, लोकेशन डेटा, कॉल डिटेल्स आणि प्रवासाच्या मार्गांचा सखोल अभ्यास केला. पोलिसांच्या दाव्यानुसार, संदीप पाटील यांनी सांगितलेला घटनाक्रम आणि प्रत्यक्ष पुराव्यांमध्ये मोठी तफावत आढळली.
तपासाअंती अशी कोणतीही लूट झालीच नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. इगतपुरी न्यायालयाने देखील या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 7 संशयितांची निर्दोष मुक्तता केली असून, तक्रार बनावट असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता तक्रारदारानेच पोलिसांच्या विरोधात आघाडी उघडल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.