Nashik News : नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे जावयाने आपल्या सासूची आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक बाबमध्ये या फसवणुकीत महिलेच्या लेकीनेही साथ दिली. त्यामुळे पैशांसाठी नाती विसरणाऱ्या या घटनेचा नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सासूला २० लाखांचा गंडा...
सासूच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत जावयाने किळसवाणं कृत्य केलं आहे. त्याहून भयंकर म्हणजे महिलेची लेक आणि नातूनेही त्याला साथ दिली. या तिघांनी मिळून या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल २० लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना जय भवानी रोड परिसरात उघडकीस आली आहे. प्रमिला रमेश मैना या रेल्वे सेवेतून सन २०२० मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेले २० लाख रुपये त्यांनी कॅनरा बँकेत जमा केले होते.
त्या आपली मुलगी कृष्णा चंडालिया आणि जावई राजेश चंडालिया यांच्यासोबत राहत होत्या. जावई राजेश याने पैशांची गरज असल्याचे सांगून सासूकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी प्रमिला मैना यांनी “बँकेतून काढून देते” असे सांगितले. यावर “तुमचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत, काढता येणार नाहीत,” असे सांगून जावयाने त्यांची दिशाभूल केली. दरम्यान काही दिवसांनी पेन्शन काढण्यासाठी त्या बँकेत गेल्या असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे समोर आले. हा प्रकार मुलीला सांगितल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देत आईला घराबाहेर काढून दिले.
यानंतर महिलेने मोठ्या मुलीसोबत बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले. यावेळी त्यांच्या अकाऊंटमधून दुसऱ्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर झाल्याचं उघड झाले. जावई, मुलगी आणि नातवाने खोट्या सह्या करून खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले होते. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.