योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच तरुणीची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. अकोला पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगणारी ही घटना बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शंकर सुरेश बोडे असं या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी PSI ला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 78, 79 आणि 126(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
तेल्हारा तालुक्यातील 27 वर्षीय तरुणी सध्या अकोला शहरात भाड्याने वास्तव्यास आहे. ती दररोज कामानिमित्त अकोला ते बाळापूर असा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करते. घटनेच्या दिवशी सायंकाळी कार्यालयीन काम आटोपून ती बाळापूरहून अकोल्याकडे निघाली असताना आरोपी पोलीस अधिकारी तिचा काही किलोमीटरपर्यंत पाठलाग करत होता. अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील व्याळा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ त्याने अचानक आपली गाडी आडवी लावून तरुणीला थांबवलं. ‘फक्त दोन मिनिटे बोलायचे आहे' असे सांगत त्याने अश्लील इशारे करत विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
तरुणीने केला ११२ वर कॉल अन् पोलीस झाले दाखल..
या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने तत्काळ अकोला पोलिसांच्या डायल 112 वर कॉल केला. कॉलवर माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणीला तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात आले. त्यानंतर दोघांनाही बाळापूर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तरुणीच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी पीएसआय विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी PSI शंकर बोडे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास बाळापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी पाटील करत आहेत.
दरम्यान, “कायदा रक्षकच जर कायदा मोडत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या घटनेमुळे अकोला पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याची तीव्र टीका नागरिकांमधून होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषी आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आलं आहे. मागील महिन्यात मुंबईत घडलेल्या अशाच घटनेनंतर आता विदर्भातील अकोल्यातून समोर आलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलासाठी हा मोठा धक्का मानला जात असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
