नाशिकच्या पखाल रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेकीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. परिणामी नाशिकच्या काठे गल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक पालिकेने पखाल रोड येथील दर्ग्याला अनधिकृत असल्याची 1 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. यावेळी दर्ग्याला स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता. आज येथील अतिक्रमण तोडण्यात येणार होतं. आज पहाटे अतिक्रमण पाडण्याची कारवाई करण्यात येणार होती. त्यामुळे रात्रीपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केला होता.
नक्की वाचा - Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, महापालिका प्रशासनाकडून कुत्र्यांचा शोध सुरू
त्यादरम्यान जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेत 10 ते 12 पोलीस कर्मचारी, 4 अधिकारी जखमी, पाच पोलीस वाहनांचेही नुकसान झालं आहे. वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला होता. यावेळी अश्रूधुराच्या नळकांड्याचाही वापर करण्यात आला होता.