राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Dowry Death : हुंडाबळीविरोधी कायदे कडक असतानाही लोभ आणि छळामुळे आणखी एका विवाहितेने आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करल्याची हृदयद्रावक घटना तळोजातील नावडे परिसरात उघडकीस आली आहे. वैशाली विनायक पवार (21) असे या विवाहितेचे नाव असून 28 ऑक्टोबर रोजी या तरुण विवाहितेने सासरकडील मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तळोजा पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मृत विवाहितेच्या सासरकडील सहा जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पती व सासू सासरे या तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशालीचे लग्न 10 मे 2023 रोजी तळोजा येथील नावडे गावात राहणाऱ्या उमेश रमेश पवार याच्याशी झाले होते. लग्नाच्यावेळी पती व सासरकडील नातेवाईकांच्या मागणीनुसार राठोड कुटुंबाने अडीच लाख रुपयांचा हुंडा आणि सोन्याचे दागिने दिले होते. मात्र तरीही वैशालीने माहेरहून आणखी 1 लाख रुपये कार खरेदीसाठी आणावेत यासाठी तिच्यावर दबाव आणण्यात येत होता. तसेच त्यासाठी तिला त्रास दिला जात होता. वैशालीने याबाबत अनेक वेळा आपल्या पालकांना माहिती दिली होती. त्यानंतर वैशालीच्या आई वडिलांनी तिच्या सासरी जाऊन नातेवाईकांची समजूत काढली होती.
नक्की वाचा - Ambernath News: डॉक्टर पत्नीच्या डोक्यात पतीने खलबत्ता घातला, हल्ल्यामागचे कारण ऐकून धक्का बसेल
मात्र त्यानंतर देखील वैशालीचा पती उमेश पवार, सासू अरुणा पवार, सासरे रमेश पवार, नणंद सोनू राठोड, दुसरी नणंद नेहा राठोड आणि मेव्हणा कृष्णा राठोड हे सर्वजण पैशांसाठी सतत तिला छळत होते. पतीकडून व नातेवाईकांकडुन सतत होणारी मारहाण, शिवीगाळ आणि आर्थिक छळामुळे वैशाली मानसिकदृष्ट्या खचली होती. याच छळाला कंटाळून वैशालीने मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नावडे गाव येथील त्रिवेणी संकुलातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशालीचा मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.
या घटनेनंतर वैशालीच्या वडील विनायक राठोड यांनी तळोजा पोलीस ठाण्यात वैशालीचा पतीसह सासु सासरे, नणंद व इतरांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार तळोजा पोलिसांनी बीएनएस कलम 80(2), 3(5) हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पती उमेश पवार, सासरा रमेश पवार व सासू अरुणा पवार या तिघांना अटक केली आहे.