Navi Mumbai : जमीन खरेदी करताना अलर्ट राहा; भूखंड विक्रीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई नेरुळ येथील व्यावसायिकाला भूखंड विक्रीच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

नवी मुंबईतील नेरुळ येथील व्यावसायिकाला भूखंड विक्रीच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते 2024 या कालावधीत घडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी संजय रघुराई गुप्ता (वय 48), व्यवसायाने फळ विक्रेते व नवी मुंबई नेरुळ येथील रहिवासी, यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भूखंड विक्रीच्या नावाखाली त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Navi Mumbai News : महावितरणचा भोंगळ कारभार, कोपरखैरणेतील नागरिकांचा संताप

फिर्यादी संजय गुप्ता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, नवी मुंबई उलवे नोड, सेक्टर 17 मधील भूखंड सिडकोच्या 12.5 टक्के योजनेअंतर्गत मिळालेला भूखंड असल्याचे सांगून आरोपींनी त्यांच्याशी करार केला. भूखंड विक्रीच्या मोबदल्यात त्यांनी 1 कोटी 8 लाख रुपये रोख रक्कम दिली होती. मात्र त्यानंतर आरोपींनी त्यांच्या विश्‍वासाला तडा देत, मे. भक्ती लाईफस्पेसेस एलएलपी या कंपनीच्या भागीदारांशी संगनमत करून तोच भूखंड या कंपनीला विकला. त्यामुळे फिर्यादींना ना भूखंड मिळाला, ना त्यांच्या रकमेची परतफेड झाली. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली.

ही घटना 8 मार्च 2019 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत घडल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत 20 जून 2025 रोजी रात्री 9.09 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोहीते करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी संबंधित कार्यालय आणि भूखंड स्थळावर भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे. 

Advertisement

व्यावसायिकांना विश्वासात घेऊन भूखंड विक्रीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचं प्रकरण असून, यात आणखी आरोपी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

Topics mentioned in this article