Navi Mumbai Crime: Online वेबसाईटद्वारे वेश्या व्यवसाय, पोलिसच ग्राहक बनून गेले अन्... नवी मुंबईत मोठी कारवाई!

Navi Mumbai Crime: या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजेशकुमार मुण्णा यादव (वास्तव्य - जुहूगाव, वाशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग सेल (AHTC)च्या पथकाने गुरुवारी मोठी कारवाई करत ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पाच महिलांची, त्यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे, सुटका करण्यात आली आहे.

Parbhani News : शाळेच्या फीवरून वाद; संस्थाचालकाच्या मारहाणीचा पालकाचा मृत्यू

ऑनलाइन वेबसाईटद्वारे वेश्याव्यवसायाचा डाव..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये ग्राहकांना एक लिंक दिली जात होती. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एका वेबसाइटवर पोहोचवले जात होते, जिथे महिलांची छायाचित्रे दाखवून त्यांची निवड करता येत होती. ग्राहकाने निवड केल्यावर, नेरूळ, वाशी, तुर्भे येथील लॉज किंवा हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगितले जात होते आणि एका तासासाठी 4,000 इतकी रक्कम आकारली जात होती.

डमी ग्राहकाच्या साहाय्याने सापळा रचला..

८ जुलै रोजी AHTC पथकाने एक डमी ग्राहक (decoy) तयार केला आणि त्याच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर एजंटशी संपर्क साधून एका महिलेची 'बुकिंग' केली. एजंटने व्हॉट्सॲपवरून संबंधित महिलेचा फोटो पाठवला. यानंतर तुर्भेतील एका लॉजमध्ये सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे 11 वाजता पोलिसांनी त्या लॉजवर छापा टाकला. तिथे संबंधित महिला डमी ग्राहकाला दिली जात होती, यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी नेरूळमधील एका फ्लॅटवर छापा टाकून आणखी चार महिलांची सुटका केली. एकूण पाच महिलांची (त्यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश) सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजेशकुमार मुण्णा यादव (वास्तव्य - जुहूगाव, वाशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

Digital Arrest Fraud: विश्वास नांगरे पाटलांचे AI, 'डिजिटल अरेस्ट'चा फास, वृद्ध दाम्पत्याचे 78 लाख लुटले

त्याच्या चौकशीतून दिनेश शिवचरण डांगी (एजंट/दलाल) आणि मुकेशकुमार अकाल राय (रिक्शा चालक - महिलांची ने-आण करणारा) यांची नावे पुढे आली आणि त्यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील इतर तीन एजंटांची नावेही उघड केली असून, शंभू मुनिलाल उपाध्याय, बॉबी ऊर्फ मकबूल बिलाल अन्सारी, आणि धीरू हे आरोपी सध्या फरार असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

या प्रकरणी AHTCच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १४३(३) (व्यक्तीची तस्करी) व कलम ३(५) (सामूहिक उद्देश) तसेच PITA कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना नवी मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना १४ जुलै २०२५ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement