
राहुल कांबळे
सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातीलच एक धक्कादायक प्रकरण नवी मुंबईत समोर आले आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ मधल्या एका अनुभवी चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल 2 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या CA ला गंडा घालण्यात आला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या फसवणुकीत गुन्हेगारांनी Twitter, WhatsApp ग्रुप्स, बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाईट्स आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यक्तिमत्त्वांची खोटी ओळख यांचा वापर केला असल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात पीडित चार्टर्ड अकाउंटंट यांना '@VonHammerManfre' या ट्विटर खात्यावरून "Ashu Madan" नावाने एक संदेश प्राप्त झाला. त्याने स्वतःला 'Magam Stanley' कंपनीचा सीईओ असल्याचे सांगितले. त्यानंतर तो "Gokul Laroia" या नावाच्या व्यक्तीसोबत उच्चस्तरीय शेअर ट्रेडिंग करतो, अशी माहिती त्यांना देण्यात आली. नंतर ‘Gokul Laroia' याच्याशी WhatsApp वर संपर्क झाल्यानंतर पीडित व्यक्तीला ‘Angel Forum' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. त्या ग्रुपमध्ये बनावट मोबाईल नंबर वापरून अनेक जण नफा झाल्याचे स्क्रीनशॉट्स पोस्ट करत होते. यातून संबंधीत चार्टर्ड अकाउंटंटचा विश्वास संपादीत करण्यात आला. शिवाय त्याला गुंतवणुकीसाठी प्रेरित करण्यात आले.
गुंतवणुकीसाठी mswap.gennstons.com, mcgrenindca.com आणि ganstuns.com या तीन बनावट वेबसाईट्सचा वापर करण्यात आला. यामध्ये यूझरने वैयक्तिक माहिती KYC तपशील भरल्यानंतर त्यांना दररोज नफा दाखवणारी बनावट आकडेवारी दर्शवली गेली होती. त्यानंतर "Customer Service" नावाने WhatsApp क्रमांकावरून बँक खाती शेअर करून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर 8 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत पीडित व्यक्तीने टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. पुढे त्यांना बनावट वेबसाईटवर नफा दाखवण्यात आला. त्यामुळे त्यांना आणखी गुंतवणूक करण्याचा मोह झाला. त्यातून त्यांनी 2 कोटी 3 लाखां पेक्षा जास्त रक्कम गुंतवली.
ही गुंतवणूक केल्यानंतर त्यातून 6 कोटींचा फायदा झाल्याचं दाखवलं जात होतं. त्यामुळे आता हे पैसे काढण्याचं संबधीत चार्टर्ड अकाउंटंटनं ठरवलं. त्यासाठी तो त्या लोकांना संपर्क करू लागला. पण त्याला कुणीच रिप्लाय करत नव्हते. फोन उचलणे ही बंद झाले होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले त्यांनी तातडीने नवी मुंबई पोलिसात धाव घेतली आहे. गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आता गजानन कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन नेरूळ हे तपास करत आहे. नवी मुंबईत वर्षाला 300 कोटींचे सायबर फसवणूक प्रकरणे समोर येत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world