नवी मुंबई: नवी मुंबई तुर्भे एमआयडीसी परिसरात दिवाळीच्या निमित्ताने “अर्ध्या किंमतीत सोने आणि नवीन कोऱ्या नोटांचे बंडल देतो” असा आमिष दाखवून एका समाजसेवकाची तब्बल ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये काही आरोपींनी बनावट पोलीस म्हणून नाटक रचून फिर्यादीला गोंधळवून त्याच्या पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे तुर्भे परिसरात खळबळ उडाली असून तुर्भे पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मनीष दत्तात्रय वडने (वय ५१, रा. इंदिरानिवास, हनुमान रोड, श्रीनगर, नांदेड) हे समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून “दिवाळी पूजेसाठी नवीन नोटांचे बंडल आणि २४ कॅरेटचे सोन्याचे बिस्किट्स कमी किंमतीत देतो” असे सांगितले. त्यांच्या बोलण्यात फसून वडने यांनी ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता तुर्भे एमआयडीसीमधील व्हाईट हाऊसच्या मागील रस्त्यावर ३३ लाख रुपये रोख रक्कम घेऊन पोहोचले. आरोपींनी २४ कॅरेट सोन्याचे पाच बिस्किटे आणि कोऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची बंडल दाखवली.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटात बीडमधील बड्या नेत्याचा हात? मोठी अपडेट समोर
दरम्यान अचानक तीन जण बनावट पोलीस वेशात आले. त्यांनी “तुमच्यावर धाड पडली आहे, पोलीस ठाण्यात चला” असे म्हणत फिर्यादीला गाडीतून उतरवले आणि पैशांची बॅग घेऊन पसार झाले. अमितभाई उर्फ सगुण शहा, हुसेन उर्फ नजर भाई, रमेश सिंग, लहू पाटील, आरती पवार अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना उघड झाल्यानंतर १० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११:४३ वाजता तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संगणमत करून फसवणूक केली आहे. आरोपी अमितभाई उर्फ सगुण शहा यांनी फसवणुकीनंतर वारंवार फोन करून “आज देतो, उद्या देतो” असे सांगून फिर्यादीला वेळकाढूपणा केला. या गुन्ह्यांत आरोपींना सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. तुर्भे पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. बनावट पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येत आहे.
Shocking news: लिव्ह इन पार्टनरशी वाद, कारमध्ये स्वत:ला जिवंत जाळले, अंगाचा थरकाप उडवणारी घटना