Navi Mumbai News: तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहात. पण नोकरी शोधताना एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. नवी मुंबईतील खारघर येथे शिपिंग कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून 75 उमेदवारांची तब्बल 1.73 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह आठ जणांविरोधात गुरुवारी (18 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे उकळूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झालेल्या पीडितांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
75 जणांची 1.73 कोटी रुपयांना फसवणूक
नवी मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून 75 जणांची 1.73 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका शिपिंग कंपनीचा मालक कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई जवळील खारघर येथील शिपिंग कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या आरोपींनी या पीडितांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले होते.
(नक्की वाचा : Navi Mumbai News: पहिले कुरवाळलं, नंतर उचललं, मांजराच्या पिल्लाला पिशवीत कोंबलं, जोडप्याने पुढे जे केलं ते...)
फसवणुकीचा प्रकार कसा आला उघडकीस?
खारघर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी नोकरीच्या शोधात असलेल्या 75 जणांकडून गेल्या दोन महिन्यांत 1 कोटी 73 लाख 81 हजार 400 रुपये गोळा केले, पण आश्वासनानुसार नोकरी मिळवून दिली नाही. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पीडितांनी नोकरीबाबतच्या माहितीसाठी कंपनीशी संपर्क साधला, तेव्हा आरोपींनी त्यांना दाद देणे बंद केले.
(नक्की वाचा : Kalyan News: मॉर्निंग वॉकला गेलेले 100 हून जास्त वृद्ध नदी घाटावरच अडकले; मुजोर बिल्डरची धक्कादायक कृती)
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे असेही सांगितले की, पीडितांपैकी एकाने सोमवारी (15 जून) पोलिसात तक्रार नोंदवली, ज्यामध्ये सर्व 75 उमेदवारांची ओळख आणि त्यांच्या वतीने आरोपींना देण्यात आलेल्या रकमेचा उल्लेख करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे.
(Content Source PTI)