- पोटच्या मुलाने वडिलांची मोठी फसवणूक केली
- वडिलांचे चार फ्लॅट्स परवानगीविनाच भाड्याने दिले
- बनावट भाडेकरार तयार केल्याचा मुलावर आरोप
- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai: कष्टाने उभी केलेली मालमत्ता पोटच्या मुलानेच हडप केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आलीय. वडिलांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मालकीचे चार फ्लॅट बनावट भाडेकरारांच्या आधारे भाड्याने देत त्यातून तब्बल 17 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी असणारे प्रकाश त्रिंबक पाटील (वय 71, नवीन पनवेल) हे सेवानिवृत्त आहेत. करंजाडे परिसरात त्यांच्या मालकीचे चार निवासी फ्लॅट आहेत. हे फ्लॅट ‘टू डे ब्लीस' आणि ‘सहारा संकल्प' या इमारतींमध्ये आहेत. त्यांचा मुलगा प्रशांत प्रकाश पाटील (वय 45 वर्षे) याने वडिलांची परवानगी न घेता या फ्लॅट्सबाबत बनावट भाडेकरार तयार केल्याचा आरोप आहे.
कशी केली फसवणूक?
आरोपी प्रशांत पाटील याने भाडेकरारावर वडिलांचे फोटो चिकटवून त्यांच्या खोट्या सह्या केल्या. वडिलांना कोणतीही कल्पना न देता हे चारही फ्लॅट्स परस्पर भाड्याने दिले. भाडे आणि अनामत रक्कम मिळून 17 लाख 40 हजार रुपये त्याने स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केल्याचे तपासात उघड झालंय. वडिलांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
(नक्की वाचा: Navi Mumbai News: निवडणूक संपताच तलवारधारींचा धुमाकूळ, दहशत माजवणारे नक्की कुणाचे गुंड?)
पोलीस कारवाई
या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपी प्रशांत पाटील याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 336, 338 तसेच भारतीय दंड संहिता (IPC) कलम 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त यांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार पुढील तपास करत आहेत.
पोटच्या नात्यातील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेमुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली असून वृद्ध नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.