राहुल कांबळे
बारमध्ये जोरदार राडा झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवी मुंबईच्या शिरवणे इथल्या लैला बार बाहेरचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला कारण ही तसेच आहे. हा राडा ज्या वेळी झाला त्यावेळी मारहाण करणाऱ्यांनी तलवारी बाहेर काढल्या होत्या. एक टोळकं एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणानंतर नवी मुंबईतल्या बारचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शिरवणे गावातील लैला बार परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मोठा गोंधळ उडाला होता. रात्री दिड वाजताच्या सुमारास बारमधील काही कर्मचारी व ग्राहक यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही गटात मारामारी झाली. याच गोंधळा दरम्यान काही अज्ञात इसम तलवारी फिरवत होते. त्यामुळे या परिसरात त्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
रात्रीच्या अंधारात तलवारीसह फिरणाऱ्या या व्यक्तींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं तर काहींनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. शिरवणे परिसरात उशिरा रात्री अशा घटना वारंवार घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः लैला बार परिसरात रात्रीच्या वेळी होणारे वाद, गोंधळ आणि संशयास्पद हालचालींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती व दहशतीचं वातावरण आहे. नागरिकांनी पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
नवी मुंबईत अनेक ठिकाणी बार आणि डान्सबार खुले आहेत. त्यातून अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. नियम धाब्यावर मारून हे बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. हे अनेक वेळा समोर आले आहे. मात्र तेवढ्या पुरता कारवाई होते. पण पुढे काहीच होत नाही. हे बार चालुच राहातात. त्यातून तिथे राहणाऱ्या स्थानिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रारी होतात. पण कारवाईच्या नावाने छोट्या मोठ्या तक्रारी घेतल्या जातात. त्याच काही एक परिणाम या बार मालकांवर आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांवर ही होताना दिसत नाही.