सुनिल दवंगे
साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शिर्डीत एका अंध मुलाला दृष्टी मिळाली. असा दावा उत्तराखंडमधील एका कुटुंबानं केला आहे. या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं. कुटुंबानी त्यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली होती. हे कुटुंब उत्तराखंड हून दर्शनसाठी शिर्डीत ही आलं. त्यांनी मुलासह साईबाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर बघतात तर काय चमत्कार झाला. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यामुलाला दृष्टी मिळाली. त्याला दिसू लागलं असा दावा या कुटुंबाने केला आहे. या कथित चमत्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे.
उत्तराखंडमधील एक कुटुंब शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आलं होतं. त्यांच्या मुलाला जन्मापासूनच एका डोळ्याने दिसत नव्हतं. मात्र, द्वारकामाईत दर्शन घेतल्यानंतर त्या मुलाला अचानक त्या डोळ्यानेही दिसू लागलं. असा दावा कुटुंबाने केला आहे. त्यामुलानेही याबाबत आपलं मत मांडलं आहे. तो म्हणतो माझ्या डोळ्यांवर काही प्रकाश पडला. त्यानंतर मी थोडा घाबरलो. माझ्या एका डोळ्यात दृष्टी नव्हती, मला काहीच दिसत नव्हतं. पण साईबाबांच्या मूर्तीसमोर गेल्यावर माझ्या डोळ्यांवर प्रकाश आला आणि आता मला दिसू लागलं आहे, असं त्या मुलानं सांगितलं आहे.
या कथित चमत्कारावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हणजेच अंनिसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अंनिसने या दाव्याला पूर्णपणे फेटाळून लावले आहो. तो “अंधश्रद्धेचा प्रसार” असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “साईबाबांवरील श्रद्धेचा आम्ही सन्मान करतो, पण दृष्टी आलेल्या मुलाचा हा कथित चमत्कार निखालस अंधश्रद्धा आहे असं अनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं. हा अंधविश्वास असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.
साई मंदिराच्या अगदी जवळच नेत्ररुग्णालय आहे, जिथे ऑपरेशन आणि नेत्रप्रत्यारोपण करून अनेकांना दृष्टी मिळते. जर साईबाबांच्या चमत्कारानेच दृष्टी येत असेल, तर त्या रुग्णालयाने दरवाजे बंद करावेत आणि रुग्णांना थेट मंदिरात पाठवावं,” असं अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आव्हान केलं आहे.अशा प्रकारच्या “चमत्कारांच्या” दाव्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक असल्याचं मत अंनिसने व्यक्त केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world