NEET पेपर फुटीचं लातूर कनेक्शन, दोन शिक्षक ताब्यात; धक्कादायक माहिती उघड

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
लातूर:

प्रतिनिधी, राहुल कुलकर्णी

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना अटक केली आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे.

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट व जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर, लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

नक्की वाचा - Live Update : आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

दोघेही 'पीएचडी' धारक, खासगी क्लासेस घ्यायचे
संजय जाधव व जलील उमरखाँ पठाण हे दोघेही पीएचडीधारक आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असले तरी ते लातूरमध्ये खासगी क्लासेसही घेतात. 'नीट'चा पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.