KDMC रुग्णालयातील डॉक्टरांचा अक्षम्य निष्काळजीपणा, सिझेरियनदरम्यान गोधडीप्रमाणे...; महिलेच्या जीवाला धोका

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.  सिझेरियन प्रसूतीदरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घातल्यामुळे एका महिलेच्या पोटात मोठ्या प्रमाणात संसर्ग (इन्फेक्शन) झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. धनश्री सानप असं या महिलेचं नाव आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मात्र सिझेरियन दरम्यान तिच्यासोबत जो प्रकार घडला त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे.

सिझेरियनदरम्यान डॉक्टरांकडून मोठी चूक? 

कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरात राहणाऱ्या धनश्री सानप या गरोदर महिलेला काही दिवसापूर्वी प्रसूतीसाठी कल्याण पूर्व येथील शक्तीधाम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना प्रसुतीसाठी केडीएमसीमधील टिटवाळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याच ठिकाणी धनश्री यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र सिझेरियनदरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आले. त्यामुळे धनश्री यांना पोटात मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झाल्याच्या त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलेच्या सिझेरियननंतर अक्षरश: गोधडीप्रमाणे टाके टाकण्यात आले आहेत.  यादरम्यान महिलेच्या प्रकृतीला काही गंभीर धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Navi Mumbai : 9 दिवस, दीड कोटी अन् 1000 सिम कार्ड; भीती दाखवित इंजिनियरचं भयंकर कांड

केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये यापूर्वीही निष्काळजीपणाच्या तक्रारी समोर आल्या असून या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

डॉक्टरांनी काय सांगितलं? 

याबाबत केडीएमसीच्या शक्तीधाम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, 14 जूनला धनश्री यांना कल्याण पूर्व येथील शक्तिधाम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परत प्रसूतीसाठी त्यांना टिटवाळा येथील केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. 24 तारखेला त्यांचं सिझर करण्यात आलं होतं. नंतर संबंधित महिला घरी गेली आणि परत त्यांच्या पोटात त्रास झाल्याने त्या 9 तारखेला आमच्याकडे दाखल झाल्या. पोटात इन्फेक्शन दोन कारणाने होऊ शकतो एक तर घरी महिलेने निष्काळजीपणा केला असेल किंवा सिझेरियन करताना काहीतरी चूक झाली असेल. नक्की काय प्रकार घडला आहे चौकशीनंतर समोर येईल. डॉक्टरांनी कॅमेऱ्यावर काही बोलल्यास नकार दिला. दरम्यान, या घटनेबाबत केडीएमसी प्रशासन आणि आयुक्त काय भूमिका घेतात, तसेच या आरोपांवर त्यांचे काय स्पष्टीकरण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Topics mentioned in this article