Navi Mumbai : ATS अधिकारी असल्याचे भासवून, बनावट अरेस्ट वॉरंट पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १ कोटी ५४ लाख ९८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील एका महत्त्वाच्या आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा उच्चशिक्षित इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्याने हजारांहून अधिक सिमकार्ड सक्रिय करून परदेशात पाठवल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, २३ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत फिर्यादीला अज्ञात व्यक्तींनी मोबाईल, व्हॉट्सअॅप आणि सिग्नल अॅपद्वारे संपर्क साधला. आरोपींनी स्वतःला एटीएस अधिकारी असल्याचे भासवून आरबीआयचे बनावट पत्र आणि बनावट अरेस्ट वॉरंट पाठवले. अटक आणि पोलीस कारवाईची भीती दाखवत, कारवाई टाळण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. या माध्यमातून फिर्यादीकडून १,५४,९८,००० रुपये उकळण्यात आले.
विविध कंपन्यांचं सिमकार्ज कंबोडियाला पाठवलं...
या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८/२०२६ अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. व्हॉट्सअॅप, सिग्नल अॅप आणि वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान उमंग विजयभाई लाकोड (वय २४, रा. अमराईवाडी, अहमदाबाद, गुजरात) याला ३ जुलै २०२६ रोजी वडोदरा येथून अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून ३४७ सिमकार्ड, ३ मोबाईल फोन, २ डेबिट कार्ड, ६ चेकबुक, १ पासबुक आणि २ आधारकार्ड जप्त करण्यात आले. तपासात आरोपीने विविध कंपन्यांची सिमकार्ड सक्रिय करून ती कंबोडिया येथे पाठवल्याचे उघड झाले आहे. तसेच त्याने आतापर्यंत १,००० हून अधिक सिमकार्ड सक्रिय करून परदेशात पाठविल्याची माहितीही समोर आली आहे.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पुढील तपास नवी मुंबई सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world