नेस्को सेंटरमधील विद्यार्थ्यांचा मृत्यू कोणत्या ड्रग्जमुळे? शरीरावर कसा होतो परिणाम? रेट कार्डही आलं समोर

नेक्सोतल्या वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्डही आता समोर आलंय. या कॉन्सर्टमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचं तिकीट होतं, अशी माहिती समोर आलीय. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Mumbai Nesco Center Drugs : 11 एप्रिलची रात्र. गोरेगावचं नेस्को सेंटर. हजारोंच्या संख्येत म्युझिकवर थिरकण्यासाठी तरुणाई, पण बिट्सवर थिरकताना काही तरुण अचानक अस्वस्थ झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आणि उजेडात आलं ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईचं काळं वास्तव. मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये इटलीचा टेक्नो 9 टाईम 9 हा म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. कॉन्सर्टसाठी इतकी गर्दी झाली होती की सुरक्षा रक्षकांनाही न जुमानता बॅरिकेटिंगवरुन उड्या मारुन अनेक तरुण आत घुसले होते. कॉन्सर्टवेळी अचानक तीन जणांना अस्वस्थ वाटू लागलं आणि दोन कॉलेजवयीन विद्यार्थ्यांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं. तर एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. 

या प्रकारावरुन रान पेटल्यानंतर कॉन्सर्टचा आयोजक विहान उर्फ आकाश समाल, नेस्को इव्हेंटच्या व्यवस्थापनाशी संबंधित सनी विनोद जैन, सुरक्षाविभागातील बालकृष्णन कुरुप आणि ड्रग्ज पुरवठा करणारा आनंद पटेल याला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. तसचं प्रतीक पांडे, रौनक खंडेलवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलयं. दरम्यान कॉन्सर्टला येण्याआधी मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांनी एक्सटसी नावाचं ड्रग्स घेतलं होतं.  

Advertisement

एक्सटसी ड्रग्स नेमका काय आहे? (What is Ecstasy Drug)

एक्स्टसी हा एक सिंथेटिक सायकोॲक्टिव्ह ड्रग आहे. जो मेंदूला उत्तेजित करतो आणि भास निर्माण करतो. याचं रासायनिक नाव आहे — मेथिलिन डायऑक्सी मेथॅम्फेटामिन (MDMA). रस्त्यावर तो ‘मॉली' किंवा ‘ई' या नावाने ओळखला जातो. हा ड्रग प्रामुख्याने गोळ्यांच्या स्वरूपात वापरला जातो. अनेकदा चमकदार, रंगीत गोळ्या, तर काही वेळा पूड किंवा क्रिस्टल स्वरूपातही मिळतो. 

नक्की वाचा - Kalyan News : नेस्को सेंटरमध्ये ड्रग्स पुरवणाऱ्याच्या बापाचं मोठं कांड; कारनामे ऐकून बेट्यापेक्षा बाप सवाई!

एक्सटसी शरीरावर कसा परिणाम करतो हे पाहिलं तर तुम्ही चक्रावून जाल...

एक्सटसी घेतल्यानंतर मेंदूमध्ये सेरोटोनिन या रसायनाची मोठी मात्रा सोडली जाते. सेरोटोनिन मूड आणि भावना नियंत्रित करतं. ड्रग घेतल्यानंतर पहिल्या 30 ते 45 मिनिटांत प्रचंड उत्साह आणि ऊर्जा जाणवते. 1 ते 3 तासांनंतर शरीरातली पाणीपातळी कमी होते, शरीर जास्त तापतं, अस्वस्थता वाढते. यानंतर चिंता, थकवा आणि गोंधळ जाणवू शकतो. हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. झटके येतात किंवा शुद्ध हरपते. गर्दीच्या, उष्णतेच्या आणि उच्च-ऊर्जा असलेल्या वातावरणात अर्थात कॉर्न्सटसारख्या ठिकाणी हे धोके अनेक पटींनी वाढतात. त्यातच दारू किंवा पुन्हा पुन्हा ड्रग घेतलं तर धोका अधिक वाढतो.  

मुंबईतील कॉन्सर्टमध्ये काय चुकलं?

या प्रकरणात पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की, कॉन्सर्टदरम्यान डान्स करताना प्रचंड शारीरिक हालचाली झाल्या. पीडितांनी तपासणी न झालेल्या किंवा जास्त शक्तिशाली गोळ्या घेतल्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. महत्वाची बाब म्हणजे MDMA चा डोस पूर्णपणे अनियंत्रित असतो. ‘एक्सटसी' म्हणून विकल्या जाणाऱ्या गोळ्यांमध्ये सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त MDMA, विषारी रसायनं किंवा पूर्णपणे वेगळे सिंथेटिक ड्रग्सही असू शकतात. यामुळे एकच गोळीही जीवासाठी धोकादायक ठरू शकते.

नेक्सोतल्या वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्डही आता समोर आलंय. या कॉन्सर्टमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचं तिकीट होतं, अशी माहिती समोर आलीय. 

नेक्सोतील 'त्या' म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड!

  • स्टेज टेबलचा दर तब्बल ३ लाख रुपये

  • व्हीआयपी टेबलचा दर एक लाख ते दीड लाखाच्या घरात 

  • बॅकस्टेजचा दर 5 हजार 999 रुपये

  • तर VIP पासची किंमत होती अडीच हजारापासून 10 हजारापर्यंत


या प्रकरणात आता अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कॉन्सर्टवेळी तरुणांना कुरिअरद्वारे एका अॅपच्या माध्यामातून हे ड्रग्स पुरवण्यात आलंय आणि तो पुरवणारा होता आनंद पटेल. अटक करण्यात आलेल्या प्रतिक पांडेच्या जबाबदानुसार पोलिसांनी आनंद पटेलला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, नेस्कोमध्ये पार पडलेल्या कॉन्सर्टसाठी सगळ्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या. राज्य उत्पादन विभागानेही दारु विक्रीसाठी परवानगी दिली होती. आयोजकांनी सगळे पैसेही भरले होते. पण ड्रग्समुळे हा कॉन्सर्ट आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. तिकडे मिरा भाईंदरमध्ये तर झोम्बी ड्रग्सचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाईंदर पश्चिमेतील 90 फिट रोड आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूला झोंम्बी ड्रग्स घेतलेल्या एकाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मिरा-भाईंदरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.