राहुल कांबळे
झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण हातात आहेत ते पैसे ही गमावून बसतात. असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. कोणी दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखतो तर कुणी तिप्पट पैशांची हमी देतो. पण नवी मुंबईत घडलेल्या घोटाळ्यात दुप्पट, तिप्पट बरोबर दहा वर्षात चौपट पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतले जवळपास एक दोन नाही तर तब्बल 3 लाख लोक बळी पडले आहे. संबंधीत कंपनीनं या सर्वांना 500 कोटींचा गंडा घालत पोबारा केला आहे. त्यामुळे संबधीत कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी एकच गर्दी केली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आवाहन एका चिटफंड कंपनीने केले होते. टोरेस लिमिटेड असं या कंपनीचं नाव होतं. माफकोमार्केटच्या समोर त्यांनी आपलं कार्यालय थाटलं होतं. त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि 10 वर्षामध्ये चौपट रक्कम देण्याचे सांगितलं. शिवाय दर महिन्याला विशिष्ठ व्याजही गुंतवणुकदारांच्या खात्यात जमा होईल असंही सागंण्यात आलं. येवढ्या आकर्षक योजनेला कुणाची भुरळ पडणार नाही? नेमकं तसचं झालं. या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मुंबई आणि उपनगरातल्या जळपास 3 लाख लोकांनी यात गुंतवणूक केली.
ट्रेंडिंग बातमी - Mumbai News: एकाच नंबरच्या दोन गाड्या ताज हॉटेलमध्ये आल्या, अन् पुढे जे घडलं ते...
या कंपनीचे मुख्य ऑफीस हे दादर ला आहे. शिवाय भाईदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यातून अनेकांनी गुंतवणूक केली होती. पण दादर येथील मुख्य कार्यालय अचानक बंद झाले. शिवाय मीरा भाईंदरमधील शोरूम देखील बंद करण्यात आले. ही दोन्ही कार्यालय बंद झाल्याची माहिती गुंतवणुकदारांना मिळाली. त्यांनी तातडीने या कार्यालयांकडे धाव घेतली.
दोन्ही कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. त्यांचा आक्रोश होता. पण तो ऐकायला कोणी नव्हतं. कार्यालयाला टाळं लागलं होतं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणुकदारांच्या लक्षात आलं होतं. मोठ्या कष्टाने साठवलेले पैसे घेवून कोणी तरी व्यक्ती पळाला होता. या गोंधळानंतर पोलिस घटनास्थळी आले होते. त्यांनी चौकशी केल्यानंतर जवळपास 3 लाख लोकांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या समोर आले. त्यांच्याकडून तब्बल 500 कोटींची रक्कम घेवून कंपनीचा मालक पसार झाला होता. सुर्वे नावाची व्यक्ती हे पाचशे कोटी घेवून फरार झाली आहे. त्यांचा आता शोध घेतला जात आहे.
लोकांमध्ये याबाबत प्रचंड राग आहे. गोरगरीबांनी यात गुंतवणूक केली होती. आम्हाला आता व्याज नको. जे पैसे आम्ही गुंतवले आहेत ते तरी आम्हाला मिळावेत अशी मागणी होत आहे. दादर इथल्या कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आम्हाला कार्यालयातू जावू दे अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. मात्र पोलिस आपल्याला आत जावू देत नाहीत अशी तक्राही ते करत आहेत. या कंपनीचा मालक हा परदेशात पळाल्याचा आरोप ही गुंतवणूकदार करत आहेत. अशा वेळी आमचे पैसे कोण देणार हा खरा प्रश्न या सर्वांना पडला आहे.