अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Crime News Today : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.करडे घाट परिसरात दोन गुन्हेगारी गटांमधील वाद विकोपाला गेल्याने थेट गोळीबाराची घटना घडली.या हल्ल्यात सराईत गुन्हेगार विशाल काळे याची निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील वाढत्या टोळी संघर्षाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,काही दिवसांपूर्वी शिरूरमधील नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणात विशाल काळे आणि सनी यादव हे आरोपी होते.दोघांनाही नुकताच जामीन मंजूर झाला होता.जामिनावर बाहेर आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच करडे घाट परिसरात दोघांची समोरासमोर भेट झाली.यावेळी त्यांच्या वाहनांची धडक झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसाचारात झाले.
परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
आरोपी सनी यादव याने विशाल काळे याच्यावर चार राऊंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.गोळीबारानंतरही हल्लेखोरांनी थांबून न राहता विशाल काळे याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून फरार आरोपी सनी यादव याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
नक्की वाचा >> Girija Oak Godbole: 'नॅशनल क्रश' उपाधीआधी आयुष्य कसं होतं आणि नंतर कसं बदललं? गिरीजा ओक यांनी सगळच सांगितलं
पोलिसांकडून विविध तांत्रिक माध्यमांच्या मदतीने तपास सुरू आहे.दरम्यान,गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षाच्या घटना वाढताना दिसत आहेत.रांजणगाव एमआयडीसी परिसर,खेड-एमआयडीसी तसेच विविध विकास प्रकल्प आणि गौण खनिज उत्खननाशी संबंधित वादांमधून अनेकदा गटांमध्ये संघर्ष उफाळून येत असल्याचे चित्र आहे.
नक्की वाचा >> "आम्ही 1500 रुपये आता देतोय, पुढे 2100 रुपये देऊ,पण..", लाडकी बहीण योजनेबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
त्यातच शिरूरमधील ही घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या टोळीवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.शिरूरमधील या हत्येनंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वातील वर्चस्वाच्या संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.