मंडईत कांदा खरेदी करताना या चेहऱ्यामागील कथा तुम्हाला व्यथित करेल! संभाजीनगरच्या बळीराजासोबत भयंकर घडलं

शुक्रवार १५ मे रोजी सायंकाळी चंद्रभान गाडे हे गावात जाऊन येतो' असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. अशीच एक हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे उघडकीस आली आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि कुटुंबातील आजारपणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. चंद्रभान कचरू गाडे (वय ५४) असं या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

रात्री उशीरापर्यंत घरी आलेच नाहीत...

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवार १५ मे रोजी सायंकाळी चंद्रभान गाडे हे गावात जाऊन येतो' असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अमळनेर गायरान परिसरातील पाझर तलावाजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केलं.

Advertisement

शेतमालाला कवडीमोल बाजारभाव...

चंद्रभान गाडे यांच्याकडे गट क्रमांक ९२ मध्ये अवघी एक एकर शेती होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते या जमिनीत ऊस आणि कांद्याचे पीक घेत असत. परंतु, गेल्या काही काळापासून खते, बियाणे आणि औषधांचे गगनला भिडलेले भाव आणि दुसरीकडे शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव यामुळे शेती पूर्णपणे तोट्यात चालली होती. शेतीतून खर्चही निघत नसल्याने गाडे यांच्यावर मोठं कर्ज झालं होतं. जे फेडणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते.

नक्की वाचा - कलिंगडामुळे आणखी एक मृत्यू? छातीत जळजळ म्हणून कलिंगड खाल्लं; रुग्णालयात नेताना वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर

केवळ शेतीचे नुकसानच नाही, तर गाडे कुटुंब संपूर्ण बाजूने संकटात सापडले होते. घरात चंद्रभान हे एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यातच पती-पत्नीचे सततचे आजारपण, मुलाचे शिक्षण आणि मुलींच्या लग्नाचे उभे राहिलेले प्रश्न यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. घरात वृद्ध आई आणि आजारी पत्नीची जबाबदारी कशी पेलायची, या विवंचनेतूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.