Palghar News: रिक्षातून आले, मुलींचे फोटो काढले; पालघरमध्ये साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली, सुदैवाने...

पालघर जिल्ह्यातील दांडी गावात साधू हत्याकांडासारखी धक्कादायक घटना पुन्हा घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar News : पालघर जिल्ह्यातील दांडी गावात गडचिंचले येथील साधू हत्याकांडासारखी धक्कादायक घटना पुन्हा घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पालघर पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे. परराज्यातून रिक्षातून कपडे विक्रीसाठी आलेल्या चौघा जणांवर ग्रामस्थांनी मुलं चोरणाऱ्या टोळीचा संशय व्यक्त करत त्यांना घेराव घातला. हे चौघे गावात फिरत असताना शाळेत जाणाऱ्या मुलींचे फोटो काढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आणि वातावरण तणावपूर्ण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी संबंधित चौघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून ग्रामस्थांचे समुपदेशन करत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य हिंसाचार टळला असून गावात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास थेट पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

दांडी गावात नेमकं काय घडलं? 

९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दांडी बस स्टॉप परिसरात दांडी गावातील १३ वर्षीय दोन अल्पवयीन मुली बसची वाट पाहत बसलेल्या होत्या. त्यावेळी परराज्यातून चादरी विक्रीसाठी गावात आलेल्या चौघांनी कथितरित्या त्या मुलींचे मोबाईलवर फोटो काढले आणि कोठे जाणार आहात याबाबत विचारपूस केली. या प्रकारामुळे गावात ‘मुले पळविणारी टोळी' असल्याच्या अफवा पसरल्या आणि संतप्त ग्रामस्थांनी संबंधित चौघांचा घेराव घालत त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले. या आरोपींमध्ये सुनिल संजय सलाट (वय २२), अल्पवयीन मुलगा, (वय १७) ३) अल्पवयीन मुलगा, (वय १३) ४) चंदा सुनिल सलाट (महिला), (वय २५) यांचा समावेश आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Gulshan Kumar : गुलशन कुमार यांच्यावर भररस्त्यात 16 गोळ्या झाडल्या; 28 वर्षांनंतर कारागृहात शूटरचा मृत्यू

पालघरमध्ये अल्पवयीन मुलं-मुली पळवून नेल्याबाबत १९२ गुन्हे दाखल...

ग्रामस्थांनी कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सातपाटी पोलीस ठाणे आणि बोईसर विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी दांडी येथील तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोउपनि सोनी जवादे करत आहेत. दरम्यान, पालघर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पालघर जिल्ह्यात सन २०२५ मध्ये लहान मुले-मुली पळवून नेल्याबाबत १९२ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १८२ मुले-मुली सुरक्षितरीत्या सापडली आहेत. उर्वरित १० प्रकरणांचा तपास सुरू आहे. तपासात बहुतेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन प्रेमसंबंध किंवा घरगुती वादातून मुले घर सोडून गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही ‘मुले पळविणारी टोळी' कार्यरत नसल्याचे स्पष्ट करत, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालघर पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता तत्काळ पालघर नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन डायल ११२ किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article