मनोज सातवी, पालघर:
Palghar News: गेल्या काही दिवसांंपासून राज्यात विविध ठिकाणी अंधश्रद्धा तसेच जादूटोण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये एका भोंदुबाबाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता, ज्यावरुन संतापाची लाट उसळली होती, अशातच आता पालघरमधूनही अशीच घटना समोर आली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सूर्या नदीच्या तीरावर असलेल्या कासा येथील स्मशानभूमीत अघोरी प्रथेसाठी वापरण्यात येणारे धक्कादायक साहित्य आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अंधश्रद्धेचा प्रकार असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Amravati News : अमरावतीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम; बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने उद्धव गटाची ताकद खिळखिळी
समोर आलेल्या माहितीनुसार, स्मशानभूमीत लिंबू, शेंदूर, गुलाल, लाल कापड, आणि महत्त्वाचे म्हणजे एक लाकडी क्रॉस यांसारखी सामग्री विखुरलेली आढळली. ही दृश्ये पाहिल्यानंतर स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी येथे अघोरी आणि जादूटोणा सदृश्य विधी करण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या संदर्भात तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे आणि या घटनेमागील अज्ञात व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी आणि ग्रामीण भाग असल्याने, अशा घटनांचा गैरफायदा घेऊन लोकांमध्ये भीती पसरवणाऱ्यांवर तातडीने आणि कायद्यानुसार जरब बसेल अशी कारवाई होणे आवश्यक आहे.
( नक्की वाचा : Amravati News : अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा गंभीर प्रकार! पोलिसांवर गंभीर आरोप )