जाहिरात

Amravati News : अमरावतीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम; बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने उद्धव गटाची ताकद खिळखिळी

Amravati News :  अमरावतीमधील धारणी नगरपंचायत परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Amravati News : अमरावतीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम; बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने उद्धव गटाची ताकद खिळखिळी
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News :  अमरावतीमधील धारणी नगरपंचायत परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव गट) नेते आणि धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी शनिवारी (15 नोव्हेंबर 2025) भारतीय जनता पार्टीत (BJP) अधिकृत प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण' या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला.

प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सुनील चौथमल यांचा पक्षप्रवेश सोहळा अमरावती येथे पार पडला. यावेळी भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, निवडणूक प्रमुख खासदार अनिल बोंडे आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या मान्यवरांनी चौथमल यांना भाजपचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. धारणीच्या राजकारणात मोठे बलस्थान असलेल्या चौथमल यांच्या या 'घरवापसी'मुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

सुनील चौथमल यांचे धारणी नगरपंचायत क्षेत्रात मोठे राजकीय वजन आहे. यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (ABVP) कार्यरत असताना त्यांनी युवकांचे संघटन मजबूत करण्याचे मोठे कार्य केले आहे. चौथमल कुटुंबीयांची देखील धारणी नगरपंचायत क्षेत्रात मोठी ताकद मानली जाते. याच राजकीय ताकदीला महत्त्व देत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल बोंडे आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या विकासाच्या विचारांवर विश्वास ठेवून भाजपसोबत आपली पुढील राजकीय वाटचाल करण्याचा संकल्प केला आहे.

( नक्की वाचा : Amravati News : अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा गंभीर प्रकार! पोलिसांवर गंभीर आरोप )
 

नगरध्यक्ष पदाची उमेदवारी

या विशेष पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राजेश वानखडे, आमदार केवलराम काळे, माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्यासह गोपाल चंदन, डॉ. विलास कविटकर, सुधीर रसे, दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर, श्याम गंगराळे, आप्पा पाटील, साबुलाल पाटणकर, सुमित चावरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सुनील चौथमल यांना धारणी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, आगामी काळात धारणी नगरपंचायतीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com