मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar News : पालघर जिल्ह्यातील 'नाकोडा ज्वेलर्स'मध्ये झालेल्या तब्बल 3.72 कोटी रुपयांच्या महाचोरीने खळबळ उडाली असताना, पालघर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत हा गुन्हा उघड करून दाखवला आहे. या चोरीच्या मुख्य सूत्रधारासह एकूण 5 आरोपींना मुद्देमालासह बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे, हे सर्व आरोपी नेपाळचे नागरिक असून, ते भारत-नेपाळ सीमेवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
पालघरमध्ये 8 नोव्हेंबरच्या रात्री 'नाकोडा ज्वेलर्स' दुकान बंद झाल्यानंतर चोरट्यांनी आपल्या योजनेनुसार काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी शेजारच्या दुकानाचं शटर तोडलं आणि आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कपाटाच्या दुकानाची आणि 'नाकोडा ज्वेलर्स'ची भिंत फोडून दुकानामध्ये प्रवेश केला. आत गेल्यानंतर, चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून दुकानातील तिजोरी कापली. या दरोड्यात चोरट्यांनी 5.4 किलो सोनं, 40 किलो चांदी आणि 20 लाख रुपये रोख रक्कम, असा एकूण 3,72,35,460 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता.
( नक्की वाचा : Trending News : एका महिलेनं केली 4 लग्न, 2 पोलीस अधिकारी, दोन बँक मॅनेजरला ओढलं जाळ्यात, कसा झाला पर्दाफाश? )
या गुन्ह्याचा तपास करताना, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये मॉलचे वॉचमन दीपक सिंग आणि नरेश यांच्यासह त्यांचे नेपाळी साथीदार सामील असल्याचं स्पष्ट झालं. ही माहिती मिळताच, पालघर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करण्यासाठी तात्काळ 7 पथके तयार केली.
भारत-नेपाळ सीमेवरून अटक
पोलीस पथकांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींनी गुजरातमार्गे पळ काढला असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्यांचा माग काढत अत्यंत कौशल्यपूर्णरित्या पाठलाग केला. या कारवाईत, पोलिसांनी उत्तरप्रदेशातील नेपाळ बॉर्डरवरून 4 आरोपींना तर त्यांच्यातील एकाला सुरत येथून अटक केली.
( नक्की वाचा : Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट )
या प्रकरणातील अटक करण्यात आलेले सर्व 5 आरोपी हे नेपाळचे नागरिक आहेत. त्यांची नावं खालीलप्रमाणे
- दीपक नरबहादुर सिंग (वय 25 वर्षे, वॉचमन)
- भुवनसिंग जवानसिंग चेलाऊने (वय 37 वर्षे)
- जिवनकुमार रामबहादुर थारु (वय 43 वर्षे)
- खेमराज कुलपती देवकोटा (वय 39 वर्षे, वॉचमन)
- अर्जुन दामबहादुर सोनी (वय 44 वर्षे, सध्या सुरत-गुजरात येथे वास्तव्यास)
पोलिसांनी या आरोपींकडून चोरीला गेलेल्या ऐवजापैकी मोठा हिस्सा जप्त केला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे.
- सोने: 2.25 किलो
- चांदी: 41.4 किलो
- रोख रक्कम: 4,94,650 रुपये
- जप्त मुद्देमालाची एकूण किंमत: 3,28,18,450 रुपये