Palghar News : भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीतील क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल करत ठाणे ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक कटाचा पर्दाफाश केला आहे. शेडगाव येथील परेश टोलाराम पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तपासादरम्यान या हत्येमागे थेट सख्ख्या भावाचाच हात असल्याचे उघड झाले. फिर्यादी असलेला नरेश पाटील यानेच संपत्तीच्या वादातून आपल्या भावाला मारण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
२०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर झाला उलगडा
सायकलवरून शेडगाव येथील राहत्या घरातून वसई येथे कामावर जात असताना वाशिंद - अंबाडी रोड दरम्यान शेडगाव फाटा येथे धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि गणेशपुरी पोलिसांनी विशेष पथके तयार करून तपास सुरू केला. पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले. त्यानंतर राकेश पाटील, प्रेमजीत घरत आणि दक्षत भोईर हे तिघेही पालघर तालुक्यातील विलंगी गावचे रहिवासी असून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली.
चौकशीत मयताचा सख्खा भाऊ नरेश पाटील यानेच सुपारी देऊन हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. घर, जागा जमीन याच्या कौटुंबिक वादातून ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. चारही आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world