Palghar News : पालघर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील गोल्ड सिनेमा परिसरामध्ये एका तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही तरुणी पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात क्लर्क म्हणून कार्यरत असून आपले काम संपवून घरी परतत असताना तिच्यावर हा वार करण्यात आला. हा संपूर्ण हल्ला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हे दृश्य काळजाचा थरकाप उडवणारे आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण?
स्नेहल सावंत (वय 27) असे हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले दैनंदिन काम आटपून नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी निघाली होती. ती गोल्ड सिनेमा परिसरात पोहोचली असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या अमोल मुळे (वय 29) या तरुणाने तिच्यावर अचानक कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
भररस्त्यात झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे स्नेहलला स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच डायल 112 ची टीम अत्यंत तत्परतेने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या स्नेहलला तातडीने पालघर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला तातडीने बोईसर येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
( नक्की वाचा : 'तिने आरडाओरड केली अन्..." डहाणूमध्ये तरुणीच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; लव्ह जिहादनंतर आणखी एक प्रकार )
दोघेही MPSC उत्तीर्ण
या घटनेतील पीडित तरुणी आणि हल्ला करणारा आरोपी दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) यश मिळवले होते. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच ते शासकीय सेवेत क्लर्क पदावर वेगवेगळ्या ठिकाणी रुजू झाले होते.
स्नेहल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात क्लर्क म्हणून रुजू झाली होती, तर आरोपी अमोल हा मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क म्हणून कार्यरत होता. दोघांचे करिअर नुकतेच सुरू झाले होते, मात्र एका टोकाच्या निर्णयामुळे दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
( नक्की वाचा : Palghar News : डहाणू ते लंडन लव्ह जिहादचे भयंकर कनेक्शन! हिंदू मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या नेटवर्कची Inside Story )
काय आहे कारण?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, स्नेहल आणि अमोल यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. मात्र, त्यांच्या या नात्याला आणि लग्नाला दोघांच्याही कुटुंबीयांकडून तीव्र विरोध होता. घरच्यांच्या विरोधामुळे गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते आणि संवाद पूर्णपणे तुटला होता. याच वादातून आणि रागाच्या भरात अमोलने स्नेहलचा काटा काढण्याचे ठरवले आणि तिच्यावर हा जीवघेणा हल्ला केला.
या संपूर्ण प्रकरणावर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी माहिती दिली आहे. प्रथमदर्शनी हा प्रकार प्रेमप्रकरणातून आणि त्यांच्यात झालेल्या वादातूनच घडल्याचा संशय आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी अमोल मुढे हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पालघर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील आणि या हल्ल्यामागचे नेमके कारण सविस्तर तपासाअंती स्पष्ट होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.