प्रतिनिधी, मनोज सातवी
विरार पोलीस ठण्यामधील पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका तरुणाने पोलिसाच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडियो बनवून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शवाब युसूफ खातिब (वय 35) असं या तरुणाचं नाव आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शवाब याने एकाचवेळी 20 ते 25 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शवाब खतीब हा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.
शवाब युसूफ खातिब हा मनोर येथील रहिवासी असून त्याचे आणि सध्या पालघर पोलीस मुख्यालयात रुजू असलेले पोलीस शिपाई मयूर बागल यांच्यात आर्थिक व्यवहार होते. यातूनच बागल हे शवाबला धमकावत होते. पाच लाख रुपयांच्या वसुलीच्या नावाखाली शिवीगाळ करत खोट्या पोलीस केसमध्ये अडकवण्याची आणि आत टाकण्याची धमकी बागल यांच्याकडून वारंवार दिली जात होती. तसेच पत्नी आणि मुलीच्या मोबाइल नंबरवर फोन करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप सशवाब याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.
शुक्रवारी पहाटे दहिसर चेक नाका येथील एका हॉटेल बाहेर शवाब खतीबला बोलावून पोलीस शिपाई मयूर बागल यांनी त्यांच्या साथीदारांसह शवाब याला बेदम केली मारहाण केली. शिवाय त्याच्याकडील 25 हजार रुपये सुद्धा हिसकावून शवाब खातीब याने सांगितले आहे. त्यामुळे या सर्व जाताला कंटाळून आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येस केवळ पोलीस कर्मचारी मयूर बागल हेच जबाबदार असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. याबाबत पोलीस शिपाई मयूर बागल यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर या प्रकरणी तक्रार आल्यास योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा - कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातील गोळीबाराचं गूढ उलगडलं!
पोलीस कर्मचाऱ्यांची वादग्रस्त कारकीर्द
सध्या पालघर पोलीस मुख्यालयात रुजू असलेले पोलीस कर्मचारी मयूर बागल हे कायमच वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिले आहे. याआधी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना मयुर बागल यांनी एका ढाबा मालकाला भागीदारीत अवैध धंदा सुरू करण्यासाठी जागा देत नाही, म्हणून दमदाटी केल्याचं समोर आले होते. त्यानंतर ढाबा मालकाच्या तक्रारीनंतर त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती. तसेच बागल हप्ते वसुली करत असल्याचे देखील त्याच्यावर अनेक वेळा आरोप झाले असून त्याच्या या वर्तणुकीबाबत पोलीस अधिकारी देखील वैतागले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महत्वाची गोष्ट म्हणजे, शवाब खतीब हा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. आरोपीला मयूर बागल याने पाच लाख देण्याचे कारण काय ? आरोपी आणि पोलीस शिपाई यांच्यामध्ये असा कोणता आर्थिक व्यवहार होता ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी केल्यास पोलीस आणि आरोपी सोबतच्या आर्थिक संबंधाबाबत धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.