- पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावातील २५ ते ३० महिलांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे
- संशयित राजेंद्र निराळे आणि मेहबूब दस्तगीर यांनी अधिक व्याजाच्या आमिषाने महिलांना फसवले
- महिलांनी घरातील दागिने विकून, जमापुंजी गुंतवून आणि एफडी मोडून पैसे दिले होते
संकेत कुलकर्णी
बँकेच्या व्याजदरापेक्षा अधिक व्याज आणि गुंतवलेले पैसे अल्पावधीत दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या आमिषाला पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील 25 ते 30 महिलां बळी पडल्या. यातून त्यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेंद्र निराळी आणि मेहबूब दस्तगीर अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पीडित महिलांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. केवळ भाळवणी गावातच हा आकडा तब्बल 2 कोटी रुपयांच्या वर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलीस आता काय करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
संशयित आरोपींनी महिलांना अधिक पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले होते. अधिक व्याजाच्या आशेने अनेक महिलांनी आपल्या घरातील दागिने विकून, तर काहींनी वर्षानुवर्षांची जमापुंजी या योजनेत गुंतवली होती. काहीनी एफडी ही मोडली होती. काहींनी आपले मंगळसुत्र ही गहाण ठेवले. तर काही महिला या शेतावर कामाला जात होत्या. त्यातून साठवून ठेवलेली मजूरी ही त्यांनी या भामट्यांना दिली. विश्वास संपादन करण्यासाठी संशयित राजेंद्र निराळे याने काही महिलांना सुरक्षिततेची हमी म्हणून स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश (ब्लँक चेक) देखील दिले होते.
पैसे दिल्यानंतर आता दाम दुप्पट होणार. थोडे जास्तीचे पैसे आपल्याला मिळणार या आशेवर या महिला होत्या. एक दोन नाही तर अनेक महिला पैसे मिळणार याचे स्वप्न पाहत होत्या. पण पुढे काय होणार आहे याची त्यांना पुसटती ही कल्पना नव्हती. काही काळांनी त्यांनी आपले पैसे कधी मिळणार अशी विचारणा त्या भामट्यांना केली. पण त्यांच्याकडे काही ठोस उत्तर नव्हते. ते नेहमी उडवा उडवीची उत्तरे देत होती. आज नाही उद्या. उद्या नाही परवा अशा पद्धतीने टाळलं जात होतं. त्याच वेळी काही तरी काळबेरं आहे हे महिलांच्या लक्षात आलं.
काही दिवसांनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी निराळे याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे परत देण्याऐवजी, "जर पुन्हा पैसे मागितले तर आत्महत्या करेन," अशी उलट धमकी निराळे याने महिलांना दिली. या प्रकारानंतर संतप्त महिलांनी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पाठिंब्याने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक झाली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यामुळे हे रॅकेट किती मोठे आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world