भेसळ हा सध्या नित्याचाच विषय झाला आहे. अगदी हळदीपासून ते खव्यापर्यंत अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी काय खायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आता पुन्हा एकदा दूध आणि तांदूळामध्ये भेसळ होत असल्याचं उघड झालं आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आले असून या भेसळयुक्त पदार्थांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.
मोठ्या शहरामध्ये दुधाची भेसळ झाल्याच्या घटना वारंवार समोर येतात. हीच भेसळीची प्रकरणं आता थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव येथील विधीज्ञ बाजीराव देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातीलच एका दूध डेअरीमधून दूध विकत घेतले. नेहमीप्रमाणे सायंकाळी त्यांना दूध तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी दूध सकाळी गॅसवर तापवले. दूध तापवल्यानंतर दुधाला चक्क प्लास्टिकचा आकार आला. प्लास्टिकप्रमाणे दूध ताणले जाऊ लागले. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते, त्यामुळे देशमुख कुटुंबीय थक्क होऊन गेले आहे.
च्युइंगम किंवा प्लास्टिक गरम झाल्यानंतर ज्याप्रमाणे ते खेचलं जातं. अगदी तशीच परिस्थिती दूध तापवल्यानंतर झाली होती. यामुळे देशमुख कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आजवर आपण असे प्लास्टिक मिश्रित दूध तर पित नव्हतो ना या भीतीने आता त्यांना धक्का बसला आहे. या दुधात नक्की काय आहे, कशामुळे दूध प्लास्टिकप्रमाणे ताणले गेले याचा शोध लावण्याची जबाबदारी आता अन्न आणि औषध प्रशासनाचे आहे. शहरातील किती खाजगी दूध डेअरींमध्ये अशा पद्धतीचे भेसळ दूध आहे? याचाही शोध घेणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत लहान मुलांना आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून दिले जाणारे दूध जर असे भेसळयुक्त आणि विषारी असेल तर जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यायला हवी, अशी मागणी केली जात आहे.
नक्की वाचा - पर्यटकांचा हिरमोड! आणखी एका पर्यटनस्थळावर 15 सप्टेंबरपर्यंत जाण्यास बंदी
दुसरीकडे फलटणमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यात रेशनिंगच्या दुकानांमधून मिळणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फरांदवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील एका कुटुंबाला येथील रेशन दुकानातून तांदूळ घेतला होता. हा तांदूळ घरी आणून निवडत असताना त्यांच्या लक्षात आले की, काही तांदूळ मोठे व रंगाने वेगळे आहेत. त्यांनी ते पाण्यात भिजवून व दगडाने फोडून पाहिले असता काही तांदूळ प्लास्टिकसारखे आहेत. याचा त्यांनी व्हिडिओ काढला. फलटण तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांनी याबाबत तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. रेशनिंग दुकानात प्लास्टिक तांदूळ कसा दिला जात आहे, याचा उलगडा होण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world