नागिंद मोरे, धुळे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासांतच खराब झाले, एवढेच नव्हे तर ते उकळल्यावर अक्षरशः 'रबरासारखे' झाले असल्याचे एका महिलेने दाखवून दिले आहे.
नेमका काय आहे प्रकार?
शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून काही नागरिकांनी दूध खरेदी केले होते. मात्र, हे दूध घरी आणल्यानंतर आणि उकळण्याच्या प्रयत्नात असताना, ते खराब झाले. व्हिडीओमध्ये संबंधित महिलेने दाखवले आहे की, हे दूध रबर किंवा प्लास्टिकच्या तुकड्यासारखे दिसत होते. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
व्हिडिओ समोर आल्यानंतर, नागरिकांनी संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांसाठी हे भेसळयुक्त दूध अत्यंत धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
(नक्की वाचा- Halal food: भारतात 'हलाल फूड'च्या मागणीत प्रचंड वाढ, बाजार मूल्य 19 अब्ज डॉलरवर!)
FDA च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल आणि शुद्धतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या दिवाळीसारखे सण-उत्सवाचे दिवस असल्याने बाजारात दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. अशा काळात जर सर्रासपणे भेसळयुक्त दुधाची विक्री होत असेल, तर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world