- रेवती हिंगवे, पुणे प्रतिनीधी
सध्याचं जग हे सोशल मीडियाचं जग आहे असं म्हटलं जातं. रिल्स च्या माध्यमातून लाईक्स मिळवण्यासाठी सध्याची तरुण पिढी विविध गोष्टी करत असतात. अनेकदा सोशल मीडियावर लाखो-करोडो व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुणाई गुन्हेगारीचा मार्ग पत्करतानाच्या घटना समोर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातला एका पोलीस दलाचा कर्मचाऱ्याचा मुलगा याच नादामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
नेमकं घडलं तरी काय?
पुणे ग्रामीण पोलीस दलातील कार्यरत एका कर्मचाऱ्याच्या मुलाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपला एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात तो हवेत गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साहजिकच नजिकच्या परिसरात याची चर्चा सुरु झाली. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ तीन वर्ष जुना असल्याचं समोर आलं.
वेब सिरीजच्या पात्राची कॉपी करणं पडलं महागात !
तीन वर्षांपूर्वी केलेला हा व्हिडीओ तेव्हा कोणाच्याही नजरेस आला नसावा. परंतु लाईक्स आणि शेअर्सच्या मोहापायी या पोलीस पुत्राने पुन्हा तोच व्हिडीओ, OTT प्लॅटफॉर्मवर गाजत असलेल्या मिर्झापूर-३ या वेबसिरीजमधील गाजलेलं पात्र कालीन भैय्या च्या डायलॉगसह शेअर केला. ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
व्हिडीओची दखल पोलिसांनी घेतली, गुन्हा दाखल -
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दखल पुणे ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा सध्या २२ वर्षांचा आहे. ज्यावेळेस हा प्रसंग घडला तेव्हा सदर आरोपी अल्पवयीन होता की नाही याबद्दल अद्याप साशंकता असल्यामुळे पोलिसांनी याबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला आहे. तपासाअंती या बाबी स्पष्ट होतील अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलामुळे पोलीस हवालदारावरही गुन्हा दाखल -
याचसोबत ज्या रिव्हॉल्वरमधून आरोपीने गोळीबार गेला ती रिव्हॉल्वर हवालदाराची खासगी रिव्हॉल्वर असल्याचं कळतंय. वालचंदनगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलगा, त्याचे हवालदार वडील व व्हिडीओ शूट करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झाली नसून चौकशीअंती कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.