देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati Crime News : बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत देहव्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करूवून घेतला जायचा, असा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लॉजिंग व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमणे (रा.सावळ,ता.बारामती),धिरज रामभाऊ जाधव (रा.जालना), सागर संजय सोडबुके ( रा. बारामती), मेराजुल जानीफ अली (रा.गोलपारा,आसाम), अफजल मझीबर रहमान हुसेन (रा.बरपेटा, आसाम) आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (रा.बरपेटा,आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे ही कारवाई करण्यात आली.
नक्की वाचा >> अख्ख्या महाराष्ट्रात या बिझिनेस वुमनची चर्चा, 2467 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक, कोण आहेत अर्चना कुटे?
आसाम येथील चार महिलांची सुटका
आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर ते उपजीविका चालवतात, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाले आहे.या कारवाईत पोलिसांनी आसाम येथील चार महिलांची सुटका केली.या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, धनश्री भगत पोलिस अंमलदार नितीन ढवाण, भारत खारतोडे, दादा दराडे, नीलेश वाकळे, सोनाली सूर्यवंशी, स्मिता गायकवाड ,चालक आफरीन शेख विठ्ठल तरंगे यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world