देविदास राखुंडे, प्रतिनिधी:
Baramati News: मुंबईच्या पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली होती. असाच धक्कादायक प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथे बंद करून ठेवलेल्या 27 ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात आले आहे. यवत पोलिस आणि तहसीलदारांच्या माध्यमातून या 27 कामगारांची सुटका करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व कामगार दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथील जमीन मालक हिरामण गणपत गाढवे याच्याकडे ऊस तोडणीसाठी आले होते. मात्र गाढवे यांनी या कामगारांना आपल्या गावाकडे परत जाण्यास मज्जाव केला त्यांना बंधक करून ठेवले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी येथील नाना जाधव यांनी या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यवत पोलीस आणि दौंड तहसीलदार यांच्या माध्यमातून कारवाई करत या बंधक करून ठेवलेल्या कामगारांची सुटका केली. दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा विधी सेवा समिती, पुणे यांच्या वतीने एडवोकेट देवभक्त महापुरे, एडवोकेट सुनिल म्हस्के आणि दीपक पवार यांची समिती गठीत करण्यात आली.
समितीतील सदस्य, स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, कामगार आयुक्तालयाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी राहु, कामगार विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. या संयुक्त मोहिमेत एकूण २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात येऊन संबंधित जमीनमालक हिरामण गणपत गाढवे यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.