प्रतीक्षा पारखी, प्रतिनिधी
विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात जगभरातील विद्यार्थी शिकायला येत असतात. यामध्ये मुलींचं प्रमाण ही मोठं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना काळजी करायला लावणारी ही बातमी आहे. पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या तरुणीची खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. भाग्यश्री सुडे असं या तरुणीचं नाव आहे. लातूर जिल्ह्यातील हरंगूळ हे तिचं मूळ गाव होतं.
भाग्यश्री वाघोली येथील जी.ए. रायसोनी महाविद्यालयात 'बीई कॉम्प्युटर्स' च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती 30 मार्च रोजी फिनिक्स मॉल जवळून बेपत्ता झाली होती. भाग्यश्रीचं अपहरण करुन तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासामध्ये उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केलं आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम फुलवाले, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तीन तरुणांना अटक करण्यात आलीय. हे सर्व आरोपी मुळचे मराठवाड्यातील आहेत. यापैकी शिवम हा रायसोनी कॉलेजमध्ये आयटीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तर जाधव आणि इंदोरे हे त्याचे मित्र होते.
भाग्यश्री 30 मार्च रोजी, रात्री 8.45 च्या सुमारास, कॉलेजमधून तिच्या राहण्याच्या क्वार्टरमध्ये परतली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलकडे ती निघाली होती. मॉलमधून बाहेर पडताना तिच्यासोबत तिचे मित्र शिवमसागर आणि सुरेश होते, त्यानंतर तिच्याशी संपर्क झाला नाही. भाग्यश्रीशी कोणताही संपर्क होत नसल्यानं तिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती.
खंडणीची मागणी
त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. . त्यानुसार, पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींनी पाठवलेल्या एका खात्यावर 50 हजारांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली होती. तसेच, ज्या नंबरवरुन मेसेज येत आहेत त्या नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून तपासाला सुरुवात केली होती. या तपासाच्या दरम्यान एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास करण्यात आला. त्यावेळी त्यानं हत्येची कबुली दिली.
पान टपरीवर सिगारेट ओढणाऱ्या तरुणीकडे पाहिलं अन् रंगला खुनी खेळ, नागपुरातील धक्कादायक प्रकार
काय होता हेतू?
भाग्यश्रीचं अपहरण झालं त्याच दिवशी तिच्या ओळखीच्या मित्रांनी तिचा गळा दाबून तसंच तोंडाला चिकटपट्टी लावून खून केल्याचा प्रकार उघड झाला. हत्येनंतर भाग्यश्रीचा मृतदेह सुपा गावाजवळील मोकळ्या जागेत पुरला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचा पंचनामा केला आहे. आर्थिक कर्जबाजारीपणामुळे आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केले, असा प्राथमिक निष्कर्ष आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केलंय.