राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यातील नाईट क्लब, पब्स संस्कृतीबाबत अनेक तक्रार पुढे येत आहेत. पोर्शे कार आपघातानंतर पुणे पोलिसांना यावर कारवाईला सुरुवात देखील केली होती. मात्र पुण्यातील एका हॉटेलमधील व्हायरल व्हिडीओमुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचना आणि उत्पादन शुल्क विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून एफसी रोडवरील L3 - Liquid Leisure Lounge हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी सुरु होती. काही निवडक तरुणांसाठी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.
(नक्की वाचा- आमदाराच्या पुतण्याचा प्रताप, दोघांना चिरडले,अपघातानंतर आमदार म्हणतात...)
पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांना इशारा दिला होता. परंतु ड्रग्स सारख्या गंभीर विषयाकडे देखील पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरु आहे.
हॉटेलवर पोलिसांचा कारवाई
स्टिंग ऑपरेशननंतर जाग आलेल्या पुणे पोलिसांना आता एफ सी रोड L3 या हॉटेलवर कारवाई सुरु केली आहे. हॉटेल सील करण्यात आले असून साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे. हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
(नक्की वाचा - झोमॅटो बॉयला फरफटत नेले, 8 बाइक्सना उडवलं; त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली)
उत्पादक शुल्क मंत्र्यांनाी राजीनामा द्यावा- सुषमा अंधारे
विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातील असे व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते उत्पादन शुल्क विभागाची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
याशिवाय पुण्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्यावर आमदार रविंद्र धंगेकर यांनी सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तरीदेखील त्यांच्या कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्यावर नेमका कुणाचा वरदहस्त आहे, हे तपासले पाहिजे. या प्रकरणानंतर त्यांना तत्काळ निलंबित करुन त्यांच्यावर एक चौकशी समिती नेमावी, अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.