- अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली. प्राथमिक तपासातील माहितीनुसार, महिलेने आधी मुलांना विहिरीत फेकले आणि नंतर स्वतः उडी घेतली. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाचा तपास सुरू केला. सध्या या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने आधी आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकले आणि नंतर स्वतः उडी मारून जीव दिला. ही घटना बुधवारी (3 जून) संध्याकाळी घडली. महिलेने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणांमुळे उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिघांनाही विहिरीबाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी घोडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, पण डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. तसेच गुन्हा दाखल करून या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.