Pune Crime News: पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततचा छळ आणि त्रासाला कंटाळून एका महिलेने स्वतःच्या मुलाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा छळ लावत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भरवस्तीत झालेली ही हत्या आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला कट पाहून पोलीसही चक्रावून गेले होते.
काय आहे प्रकरण?
या घटनेतील मृताचे नाव मुंजा धोंडिबा नरहरे असून त्याचे वय 25 वर्षे होते. मुंजा आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी उषा नानासाहेब चव्हाण (वय 40) यांचे गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली होती. मुंजा हा उषाला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे. वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे उषा प्रचंड तणावाखाली होती. या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.
( नक्की वाचा : 'एक हसीना थी, एक दीवाना था'..हनिमूनहून परतताच पत्नीचा खळबळजनक कारनामा; चित्रपटालाही मागे टाकेल असा शेवट! )
मुलाने रचला खुनाचा कट
उषाने तिचा त्रास पुणे शहरात कामाला असलेल्या तिचा मुलगा निखिल चव्हाण (वय 21) याला सांगितली. आपल्या आईचा असा छळ होत असल्याचे समजताच निखिलचा राग अनावर झाला. त्याने आपल्या आईला या त्रासातून बाहेर काढण्यासाठी मुंजाची हत्या करण्याचा कट रचला. या कामात त्याने आपला मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेतले. 7 जानेवारी रोजी या तिघांनी मिळून मुंजाच्या हत्येची योजना अंमलात आणली.
कशी केली हत्या?
योजनेनुसार 7 जानेवारीला उषाने मुंजाला चाकण येथे भेटायला बोलावले. त्यानंतर निखिल आणि स्वप्नील त्याला दुचाकीवर बसवून मद्यपानासाठी घेऊन गेले. दारू पिल्यानंतर संधी साधून दोघांनी मुंजावर चॉपरने सपासप वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाल्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी दगडाने त्याचा चेहरा ठेचला. इतकेच नाही तर त्याच्याकडील मोबाईल आणि ओळखपत्र घेऊन आरोपी तिथून पसार झाले. 11 जानेवारी रोजी चाकण दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला होता.
( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीत राजकीय संघर्षाला धार; भाजपा कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना अटक )
पोलिसांनी असा लावला शोध
उपायुक्त मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि औद्योगिक वसाहतीतील कामगारांकडे चौकशी केली.
घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची थोटके मिळाली होती. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि खराबावाडी येथील एका दुकानाचा छडा लावला. तिथे 7 जानेवारीला सकाळी 6:00 वाजता तीन तरुणांनी दारू खरेदी केल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी स्वप्नील पारधी याच्या दुचाकीचा शोध लावला आणि गुन्ह्याचा छडा लागला. पोलिसांनी उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांनाही अटक केली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला आहे.