पत्नी माहेरी गेल्याच्या कारणावरून जावयाने चक्क सासुरवाडीतील घरालाच आग लावल्याचा धक्कादायक समोर आला आहे. या घटनेत घरातील काही साहित्य जळाल्याने नुकसान झाले आहे. ही घटना कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सासुने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय 25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - पती- पत्नीने लेकीसह आयुष्य संपवलं; कारण ऐकून सगळेच सुन्न
साहिलचा पत्नीशी वाद झाला होता. त्यामुळे पत्नी रागाच्या भरात बुधवारी रात्री माहेरी निघून गेली. त्यामुळे साहिल गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सासुरवाडीत गेला.त्याने पत्नीला ‘मी तुझ्या घराजवळ आलो आहे. तू पाच मिनिटांत माझ्यासोबत घरी आली नाहीस, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन', अशी धमकी दिली. त्यानंतर साहिलने सासूच्या घराला आग लावली. त्यात घरातील साहित्य जळाल्याने नुकसान झालं आहे. कोथरूड पोलिसांनी पसार झालेल्या पतीला अटक केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.