Pune Cyber Fraud: पुणे शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विविध आमिषे, भिती दाखवत नागरिकांकडून पैसे लुटल्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. अशीच आणखी एक घटना पुणे शहरात घडली आहे. कोथरूड परिसरातील एका 57 वर्षीय महिलेला दहशतवादी हल्ल्यात गोवण्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी तिच्याकडून तब्बल 51 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पुणे सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.
महिलेची कशी फसवणूक झाली?
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला 25 सप्टेंबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला 'पोलीस अधिकारी' असल्याचे भासवत, महिलेने 'पहलगाम दहशतवादी हल्ल्या'दरम्यान शस्त्रास्त्रांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे खोटे सांगितले. तसेच या महिलेला आता तात्काळ आम्ही पोलीस कारवाई करणार असल्याचेही सांगितले.
त्यानंतर, लगेचच दुसऱ्या एका व्यक्तीने कॉल करून तो त्याचा 'वरिष्ठ अधिकारी' असल्याचे सांगितले. त्याने महिलेचे बँक खाते एका मोठ्या 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात वापरले गेले असल्याचा बनाव केला. आरोपींनी अत्यंत योजनाबद्धरित्या 'खाते तपासणी करण्याच्या नावाखाली महिलेकडून तिच्या आर्थिक व्यवहारांचे सर्व तपशील घेतले आणि तिला एका विशिष्ट बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले.
तब्बल 51 लाख लुटले..
सायबर गुन्हेगारांच्या धमक्या आणि बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित महिलेने कोणताही विचार न करता तिच्या खात्यातून तब्बल ५१ लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात त्वरित हस्तांतरित केले. पैसे हस्तांतरित झाल्यानंतर महिलेला अपेक्षित परतावा मिळाला नाही. तिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपींशी संपर्क झाला नाही तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली.
पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डिजिटल सायबर फ्रॉडचा स्पष्ट प्रकार आहे. आरोपींनी 'पहलगाम दहशतवादी हल्ल्या'सारख्या घटनेचा आधार घेत, महिलेच्या मनात भीती निर्माण करून ही फसवणूक केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३०८ (खंडणी), ३१८ (फसवणूक), ३१९ (तोतयागिरी करून फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
Pune News : संघर्ष पेटला! 'बिबट्याला दिसताच क्षणी गोळ्या घाला'; वनविभागाचे आदेश, तयारी सुरू...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world